आचरा : मालवण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका तोंडवळी, तळाशिल गावांसह आचरा गावालाही बसला. तोंडवळी, तळाशिल किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होत समुद्राचे पाणी मधली तळाशिल येथील भागात घुसल्याने जमिनीचा बराचसा भाग समुद्राने गिळंकृत केला आहे.
समुद्राच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. खाडी व सागर किनारा यांच्यातील अंतर काही मीटरच राहिल्याने तळाशिल भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी आलेल्या उधाणाच्या भरतीचा आचरा जामडूल बेटालाही फटका बसला असून खाडीचे पाणी जामडूलमधील लोकवस्तीत घुसले होते. हे उधाण आणखी टिकणार असल्याने धोका वाढला आहे. भयभीत ग्रामस्थांनी शासनाकडे जामडूल बेटासाठी बंधाऱ्याची मागणी केली आहे.
आचरा-जामडूल बेटावर उधाणाचे पाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत घुसले होते. त्यामुळे काही काळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.रविवारी आलेल्या उधाणामुळे पुन्हा तोंडवळी, तळाशिल गावांच्या किनारी भागाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरवर्षीप्रमाणे सलग आलेल्या उधाणात तोंडवळी किनाऱ्याचा काही मीटर रुंदीचा भाग काही क्षणांत समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने समुद्रात विलीन झाला. तोंडवळीतील ग्रामस्थ व मच्छिमारांवर किनाऱ्यावर बसून होणारी धूप पाहण्याची वेळ आली होती.
तळाशिल रस्त्यापर्यंत समुद्राचे पाणी येण्यास अवघे २० फुटाचे अंतर राहिले होते. या किनाऱ्यालगतच असलेली सुरूची झाडे उन्मळून पडत आहेत. मुख्य विद्युत वाहिनीचे खांबही धोकादायक झाले आहेत. रौद्ररूप धारण करीत उंचच उंच लाटा लोकवस्तीपासून काही फुटांवर येऊन आदळत असल्याचे चित्र रविवारी तळाशिल येथे दिसत होते. एका बाजूने समुद्र आक्रमण करीत असताना दुसºया बाजूने खाडीचे पाणी लोकवस्तीत घुसले होते. त्यामुळे स्थानिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत होता.आचरा-पिरावाडी रस्त्यावर पाणी; वाहतूक ठप्पउधाणाचा फटका तोंडवळीसह आचरा गावाला बसला आहे. उधाणाचे पाणी जामडूल बेटावरील लोकवस्तीत घुसले होते. भयभीत झालेले ग्रामस्थ घरातून बाहेर पडत रस्त्यावर येऊन थांबले होते. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस व ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर हे जामडूल बेटावर थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यावेळी जामडूल बेटाला सुरक्षिततेसाठी बंधारा नसल्याने दरवर्षी या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे सांगत उधाणाचे पाणी वाढले की जीव मुठीत धरून रहावे लागत असल्याचे जामडूल येथील ग्रामस्थांनी सांगितले. आचरा-पिरावाडीला जोडणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.