देवगड (सिंधुदुर्ग) : पहिल्याच श्रावण सोमवारपासून दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. भाविकांनी देवस्थान ट्रस्टला सहकार्य करून वस्त्रसंहितेचे पालन करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्यावतीने ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी सरपंच चंद्रकांत घाडी, ट्रस्टचे विश्वस्त अजय नाणेरकर, संजय आचरेकर, संतोष लाड उपस्थित होते.दरम्यान, कोकणात मोठ्या संख्येने गावोगावी मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये दर्शनासाठीदेखील भाविकांची गर्दी असते. तर संपूर्ण कोकणात अशाप्रकारे वस्त्रसंहिता लागू करणारे कुणकेश्वर मंदिर पहिले ठरले आहे.श्रीदेव कुणकेश्वर मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश करताना हिंदू संस्कृतीचे पालन व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्यावतीने वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्याच श्रावणी सोमवारपासून लागू करण्यात येत आहे. या वस्त्रसंहितेमध्ये अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्रे, तसेच असात्विक वेशभूषा (उदा. फाटलेली जीन्स, स्कर्ट इत्यादी) करून मंदिरात भाविकांनी प्रवेश करू नये अशी सूचना देणारे फलकही लावण्यात आले आहेत.
विनामूल्य वस्त्रे उपलब्ध करून देणारअगदीच भाविक दर्शनापासून वंचित राहू नये म्हणून मंदिर प्रशासनाद्वारे ओढणी, पंचा, उपरणे, आदी वस्त्रेही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतील ते परिधान करून भाविक दर्शन घेऊ शकतात व दर्शन झाल्यावर वस्त्र देवस्थान प्रशासनाकडे परत करावी लागतील.
सूचनांचा फलक लावलाभारतीय संस्कृती, परंपरा यांचे रक्षण, संवर्धन व जतन करणे तसेच मंदिराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीनेच वस्त्रसंहितेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. मंदिर मुख्य प्रवेशद्वारासमोरच वस्त्रसंहिता लागू करण्यात आल्यानंतर त्याबाबत सूचना देणारा फलक लावण्यात आला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, व्यवस्थापक रामदास तेजम, माजी सरपंच चंद्रकांत घाडी व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.