अनंत जाधवसावंतवाडी : संकेश्वर बांदा महामार्गाचा आराखडा तयार झाला असून हा महामार्ग आंबोली घाटातूनच जाणार आहे. त्यासाठी वनविभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच बांधकाम विभागानेही घाटमार्ग अद्याप रस्ते महामार्ग विभागाकडे वर्ग केला नाही. तरीही रस्ते महामार्ग विभागाने गेल्या चार दिवसांपासून घाटात आपले काम सुरू केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ऐन पावसाच्या तोंडावरच घाटातील दरडींवर ड्रिल करण्यात येत असून घाटमार्गाला पावसाळ्यात धोका उद्भवू शकतो. त्यामुळे कामाची परवानगी कोणी दिली यावर आता सवाल उपस्थित होत आहे.संकेश्वर बांदा महामार्गाचा आराखडा राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाकडून तयार करण्यात आला आहे. संकेश्वर पासून आजरा फाट्या पर्यंतच्या कामाची निविदा काढण्यास केंद्राकडून मंजूरी ही देण्यात आली आहे. असे असले तरी आंबोली पासून पुढे माडखोल पर्यतच्या रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. तर हा महामार्ग आंबोली घाटातून जाणार हे निश्चित असले तरी आंबोली घाट रस्ता हा वनविभागाच्या अखत्यारित येत असल्याने वनविभागा कडून परवानगी घेणे महामार्ग विभागाला बंधनकारक असणार आहे.मध्यंतरी महामार्ग विभागाने सिंधुदुर्ग वनविभागाकडे तशी परवानगी ही मागितली होती. पण ही परवानगी नागपूर मुख्य वनसंरक्षक कार्यालया कडून नाकारण्यात आली होती. तसेच महामार्ग आंबोली घाटातूनच करा पण घाटमार्गाच्या मूळ ढाच्याला कोणतीही बाधा न आणता करण्यात यावा असे या पत्रात म्हटले होते. त्यानंतर काही काळ कामही थांबविण्यात आले होते.मात्र अलिकडेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा वनविभागाकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. पण अद्याप परवानगी देण्यात आली नसली तरी महामार्ग विभागाकडून आंबोली घाटात काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे हा घाटमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे ही हस्तांतरित करण्यात आला नसताना हे काम सुरू करण्यात आल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे.जबाबदार कोण?आंबोली घाट हा पावसाळ्यात धोकादायक असतो. या घाटातून अवजड वाहने ही सोडली जात नाहीत. असे असतानाच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सर्व नियम धाब्यावर बसवत घाटातील दरडीना ड्रिल मारण्यात येत आहे.त्यामुळे घाट मार्गाला हादरा बसून ऐन पावसाळ्यात हा घाटमार्ग धोकादायक बनल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. विशेष म्हणजे वनविभागाकडून ही याला कोणतीही हरकत घेण्यात आली नाही. त्यामुळे आंबोली घाट मार्गाचे सोयरसुतक कोणाला नसल्याचे यातून दिसून येते.बांधकाम कडून आंबोली घाटमार्ग वर्ग नाहीराष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जरी आंबोली घाटात दरडीना ड्रिल करण्यात येत असले तरी अद्याप घाटमार्ग बांधकाम कडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग केला नसल्याचे सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी सांगितले.
Amboli Ghat: पावसाच्या तोंडावरच आंबोली घाटात दरडींना ड्रिल, धोक्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 6:53 PM