बांदा : बांदा शहरात राजरोसपणे खुलेआम सुरु असणाऱ्या दारु अड्ड्यावर तातडीने कारवाई करावी. तसेच दारु बंद झालीच पाहिजे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ग्रामस्थ व महिलांनी बांदा पोलीस ठाण्यावर धडक देत लेखी निवेदन दिले.
दारु अड्ड्यांमुळे युवकवर्गात व्यसनाधीनता वाढत असल्याने कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. बांद्यातील दारुमुळे होणारे परिणाम पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले. येत्या सात दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असल्याचे लेखी निवेदनही देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहरात खुलेआम दारु अड्डे सुरु आहेत. दारु अड्ड्यांमुळे अल्पवयीन युवक व्यसनाच्या आहारी जाऊन नाहक बळी पडत आहेत. वर्षभरात तीन युवकांचा दारु व्यसनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील सर्व दारु अड्डे बंद करण्यासाठी महिलांनी दारु अड्डे बंद करण्याच्या मागणीचे फलक आणत आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी निरीक्षक जाधव यांनी आपण दारुअड्ड्यांची माहिती द्या, आम्ही कारवाई करतो असे आश्वासन दिले आहे.यावेळी शामसुंदर धुरी, राजाराम सावंत, हनुमंत सावंत, ज्ञानेश्वर सावंत, साई सावंत, माजी सरपंच स्वप्नाली पवार, रितू वझरकर, सुशांती सावंत, माधुरी सावंत, निशिगंधा सावंत, ज्योती शेटकर, मनाली नाईक, मौजी मांजरेकर, सुहासिनी सावंत, शमिता धुरी, प्रमोदिनी कळपुरे, गिरीश भोगले आदींसह ग्रामस्थ उपस्थित आहेत. निवेदनावर एकूण ८४ सह्या केल्या आहेत.