कणकवली : कोरोना विषाणूचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे कणकवली शहरात शुकशुकाट पसरला होता.
फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने महामार्गावर अधूनमधून फिरताना दिसत होती. तसेच पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, व्यापारी महासंघाने केलेल्या बंदच्या आवाहनालादेखील अनेक व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला.दररोज साधारणत: पहाटे ५ वाजल्यापासून कणकवली शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठा गजबजू लागतात. व्यापारी आपली दुकाने उघडून व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ गजबजलेली दिसून येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलीकडे बाजारपेठ उशिराने उघडते.पण, लॉकडाऊनमुळे गुरुवारी कणकवली शहरात सकाळपासूनच शुकशुकाट होता. ग्रामीण भागातही काहीशी तशीच स्थिती होती. सकाळी काही वेळ तुरळक प्रमाणात किराणा मालाची दुकाने उघडली होती. मात्र, ती दहा वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आली. त्यामुळे त्यानंतर शहरात शुकशुकाट पसरला होता. अनेक नागरिकांनीही घरीच राहणे पसंत केले.कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक, मुख्य बाजारपेठ, आचरा रोड याठिकाणी दररोज अनुभवायला मिळणारी वाहतू कोंडी गुरुवारी आढळून आली नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी ८ जुलैपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळामार्फत अनेक मार्गांवरील बससेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, सिंधुदुर्गनगरी येथे जाणाºया गाड्यांच्या फेºया सुरू ठेवण्यात आल्या होत्या.कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, नांदगाव, तळेरे, खारेपाटण, कनेडी या प्रमुख मोठ्या बाजारपेठा आहेत. या बाजारपेठांमध्ये दरदिवशी मोठी रहदारी असते. लॉकडाऊनच्या निमित्ताने या बाजारपेठा सकाळपासूनच ओस पडल्या होत्या. त्यातच पावसाच्या सरी कोसळत असल्याने गारवाही पसरला होता.चोख बंदोबस्तकायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस तसेच पोलिसांची पथके ठिकठिकाणी तैनात होती. गस्तही सुरू होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच विनाकारण फिरणाऱ्या लोकांची झाडाझडती घेतली जात होती. शहराच्या सर्वच भागात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.