मेहरून नाकाडे - रत्नागिरी -देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या माध्यमातून करियर करण्याच्या संधी उपलब्ध असल्याने हिंदी शिकणाऱ्यांची संख्या चांगली वाढली आहे. सोशल मीडिया, प्रचंड प्रसिद्धी मिळवणाऱ्या मालिका यातूनही हिंदीचा प्रभाव आणि प्रसाराचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेही हिंदी भाषेला अच्छे दिन येऊ लागले आहेत.मराठी ही बोलीभाषा आणि इंग्रजी ही व्यवहाराची भाषा बनली. मात्र, चीनच्या पंतप्रधांनानी चीन भाषेतीलच व्यवहाराला मान्यता दिली. त्याप्रमाणे भारतातही राष्ट्रभाषेतून व्यवहार होणे अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील दौऱ्यामध्ये राष्ट्रभाषेचा प्रचार व प्रसार करण्यास प्रारंभ केला असल्याने भविष्यात हिंदीला नक्कीच ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.दि. १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी राष्ट्रभाषेला कायद्याने मान्यता मिळाली. मात्र १९६५ला कागदोपत्री हिंदी भाषा कार्यरत झाली. १९८०च्या दरम्यान दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसार माध्यमांमुळे हिंदी भाषा घरोघरी पोहोचली. १९९०च्या दरम्यान चॅनेल्सची संख्या वाढत गेली, त्यामुळे हिंदीचा प्रचार व प्रसार अधिक होत गेला. चॅनेल्समुळे कुटुंबियांपर्यंत हिंदी भाषा पोहोचली शिवाय हिंदीतून संवादही सुरू झाला. हिंदी भाषेचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारण या भाषेतून युवकांना करिअरची संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कला शाखेची पदवी संपादन करीत असताना हिंदी भाषेबरोबर इंग्रजी किंवा मातृभाषेतून परीक्षा दिल्यास दुभाषीची संधी उपलब्ध होऊ शकते. याशिवाय बँका, पोस्ट कार्यालये, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, खासगी कार्यालयात इंग्रजी भाषेबरोबर हिंदी भाषेतून व्यवहार सुरू आहेत. शिवाय इंटरनेट आॅनलाईन अनुवादक यांनाही मागणी होत आहे. त्याचबरोबर प्राध्यापक, शिक्षक यांची आवश्यकता आहे. व्याकरणाची उत्तम जाण व भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांना आकाशवाणी, दूरदर्शनवर काम करण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी घर किंवा देश सोडून बाहेर काम करण्याची तयारी असणे गरजेचे आहे.भारताव्यतिरिक्त अमेरिका, इजिप्त, दुबई, सिक्कीम, लडाख याठिकाणी तर हिंदी विषय स्पेशल विषय म्हणून शिकवला जातो. हिंंदीची संमेलने भरविली जातात. भारतातील हिंदी क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा विद्ववान हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी परदेश दौरे करतात. या दौऱ्यातून हिंदी भाषा शिकणाऱ्यांची संख्या, कार्यक्षेत्र यांची माहिती घेतली जाते. त्यामुळे जगात हिंदी भाषा शिकवणाऱ्यांना निश्चितच संधी उपलब्ध आहे. हिंदी भाषा घेऊन पदवी घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंग्रजी, मराठी भाषा घेऊन पदवी घेणाऱ्यांसाठी मात्र कौन्सिलिंग करावे लागते. उर्दू भाषा घेऊन पदवी परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. राष्ट्रभाषा हिंदीला सन्मान मिळणे आवश्यक असेल तर देशातल्या दक्षिणेकडील काही प्रदेशांनी हिंदीला स्वीकारलेले नाही, ते स्वीकारणे आवश्यक आहे. बोलण्याबरोबर हिंंदीतून व्यवहार होणे गरजेचे आहे. दर्जेदार लेखनाबरोबर हिंदी संमेलने भरवणे गरजेचे आहे. एकूणच हिंदीची आवड वाढली तर राष्ट्रभाषेला विश्वभरात पहिले स्थान मिळेल. २०२०ला लोकसंख्येच्या दृष्टीने भारत महासत्ता होणार असेल तर तरूणपिढीने राष्ट्रभाषेला देखील महासत्तेकडे नेलं पाहिजे. ३६५ दिवस आपण सिनेमा, गाणी, मालिका पाहात असू तर हिंदी भाषा दिनाचे महत्व केवळ एक दिवसापुरते सीमित न राहता कायम राहण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.- डॉ. चित्रा गोस्वामी, उपप्राचार्या, कला शाखा, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय.सोशल मीडियाचा प्रभावमराठी व अन्य भाषांप्रमाणे हिंदी भाषा लिखाणाची व बोलण्याची भाषा वेगळी आहे. सध्या सोशल मीडिया आणि टीव्ही मालिकांच्या प्रभावामुळे शॉर्टकट हिंदीचा वापर वाढला आहे. हिंदीचा पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषेवर याचा काहीअंशी प्रभाव दिसूू लागला आहे. मराठी, इंग्रजी, हिंदीरत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मुस्लिम कुटुंबियांची मातृभाषा उर्दू असली तरी अस्खलित मराठी बोलतात. इतकेच नव्हे; तर इंग्रजी माध्यमांतून शिक्षण घेत असणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे या कुटुंबांतील मुलांच्या तिन्ही भाषा खूप चांगल्या होतात. जगभरात दुभाषिकांना विशेषत: मागणी आहे. त्यामुळे या कुटुंबांतील युवा पिढीने या संधीचा फायदा घेत हिंदी किंवा राष्ट्रभाषेच्या प्रचार, प्रसारासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
करियरच्या संधीमुळे ‘हिंदी’कडील कल वाढता
By admin | Published: September 13, 2015 9:37 PM