विशाल रेवडेकर - फोंडा घाट--घोणसरी पिंपळवाडी येथील गतवर्षी झालेल्या शासकीय ठेकेदार संजय पडवळ यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. विशेष म्हणजे या तपासासाठी गावकरी तसेच पडवळ कुटुंबीयांनी कर्तव्यदक्ष अधिकारी तथा कणकवली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, या संशयास्पद मृत्यूचा तपास सोडाच त्या सहायक पोलिस निरीक्षकाचीही बदली करण्यात आली होती. त्यामुळे पडवळ कुटुंबीयांमध्येच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीत उलटसुलट चर्चा सुरू झाली व सध्या ही चर्चा सुरूच आहे. पडवळ कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असतानादेखील त्यांनी पोलिसांवर विश्वास दाखविला. कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूचा तपास पोलिस करतील हा भाबडा विश्वास आता दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.१३ एप्रिल २0१५ रोजी लोरे नं. १ येथील तलावानजीक संशयास्पदरीत्या गळफास लावलेल्या स्थितीत आढळलेल्या शासकीय ठेकेदार संजय जगन्नाथ पडवळ (घोणसरी, पिंपळवाडी) यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी सर्व शक्यतांची पडताळणी करण्यास सुरुवात केली. तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी कणकवली पोलिस स्थानकाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. त्याच दरम्यान पडवळ कुटुंबीयांनी मृत्यूबाबत घातपाताची शक्यता व्यक्त करत त्या दिशेने तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. संजय पडवळ यांच्या मालकीची श्रुती कन्स्ट्रक्शन नावाची संस्था कार्यरत होती. पडवळ यांचा मृतदेह मिळण्यापूर्वी एक दिवस आधी ते सायंकाळी लोरे नंबर १ येथील तलावानजीक सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन येतो असे सांगून कामगाराच्या दुचाकीने घोणसरी पिंपळवाडी येथील घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर संजय यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी तलावनजीकच्या चाराबोराच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळला होता. पडवळ यांच्या मृत्यूबाबत संशय का वाढला ?ज्या दिवशी पडवळ घराबाहेर पडले, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव नव्हता. तसेच घराबाहेर पडण्यापूर्वी एका घरगुती कार्यक्रमात ते कुटुंबासोबत जाऊन आले होते. ज्या दिवशी त्यांनी कुटुंबातील व्यक्तीला आपल्या मोबाईलची बॅटरी संपली असून आपण रात्री उशिरा घरी येतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. रात्री उशिरा पडवळ घरी न आल्याने सकाळी गावकरी तसेच नातेवाइकांनी शोधकार्य सुरू केले. त्यानंतर मोबाईल लोकेशनवरून पडवळ यांचे शेवटचे संभाषण लोरे नं १ या परिसरातून दाखवत होते. त्यानुसार शोधकार्य सुरू असतानाच दुपारी पडवळ यांनी नेलेली दुचाकी लोरे नं. १ च्या तलावानजीक संशयास्पदरीत्या आढळून आली. त्यानंतर शोधाशोध केली असता दुचाकीपासून सुमारे ३00 मीटर अंतरावर चाराबोराच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत पडवळ यांचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे घटनास्थळ पाहता पडवळ यांची उंची ५ पेक्षा जास्त असताना त्यांचा ज्या झाडाला गळफास घेतला होता, त्या झाडाच्या फांदीला मारलेली गाठ व गळफास मारलेली गाठ यामधील अंतर सुमारे ५ फुटांपेक्षा जास्त नव्हते. तसेच पडवळ यांना गळफास घ्यायचाच होता तर त्यांनी दुचाकी जमिनीवर का पाडली? तसेच ज्याठिकाणी पडवळ यांची दुचाकी होती त्याठिकाणी खूप मोठी झाडे होती, जी गळफासासाठी योग्य होती. प्रशांत लांगी यांच्या बदलीमुळे तपास ठप्पसहायक पोलिस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हा जर घातपात असेल तर आरोपी नक्कीच पकडले जातील, असा विश्वास ग्रामस्थ तसेच पडवळ कुटुंबीयांना दिला होता. हा एक आशेचा किरण दु:ख पचवण्यासाठी पुरेसा होता. मात्र, तसे न करता पोलिस प्रशासनामार्फत लांगी यांचीच बदली करण्यात आली. हा तपास ‘जैसे थे’ राहिला. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला.घातपाताचा संशयया सर्व घटना निदर्शनास येत असता गावातील मंडळी तसेच लोरे, वाघेरी, घोणसरी व फोंडा गावातील नागरिकांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत लांगी व श्वानपथकाची मागणी करत हा मृत्यू घातपात असून याचा तपास योग्य पद्धतीने व्हावा व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, अशी मागणी केली होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे सर्वत्र पोलिस तापासाबाबत नाराजीचा सूर आहे.जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून अपेक्षाघोणसरी पिंपळवाडी येथील शासकीय ठेकेदाराच्या गूढ मृत्यूबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर तपासाबाबत काय भूमिका स्पष्ट करतात व पडवळ कुटुंबीयांना न्याय मिळवून देतील काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ठेकेदाराच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
By admin | Published: August 17, 2016 10:17 PM