सिंधुदुर्ग : नारळांच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या असून, याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. पूर्वी अवघ्या दहा रूपयांत मिळणाऱ्या नारळाची किंमत आता पंचवीस रूपयांवर पोहोचली आहे. विविध रोगांची लागण आणि माकडांकडून बागांचे सातत्याने होणाऱ्या नुकसानीमुळे नारळ उत्पादनात घट झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.नारळ पीक हे कोकणातील महत्त्वाच्या बागायती पिकांपैकी एक आहे. नारळाच्या करवंटी, सोडण, झावळ, खोड यासारख्या सर्वच अवशेषांचा वापर होत असल्याने या वृक्षाला कल्पवृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. कोकणी माणसाच्या दैनंदिन आहारात तर नारळाच्या खोबºयाचा समावेश अपरिहार्य असतो. एकंदरीत संपूर्ण कोकणपट्टीतच नारळाला महत्त्वपूर्ण स्थान असले, तरी गेल्या काही दिवसांपासून या नारळाने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.गेल्या काही दिवसांपासून नारळांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात अवघ्या दहा रूपयांना मिळणाऱ्या नारळासाठी आज दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. साधारण मोठ्या नारळांच्या किंमती ३० ते ३५ रूपयांवर पोहचल्या आहेत.
दरम्यान, कोळीवर्गीय तसेच इतर रोगांमुळे नारळ उत्पादनात मोठी घट येत आहे. कोकणीतील बहुतेक सर्वच गावांमध्ये नारळ बागायतींचे माकडांकडून सातत्याने नुकसान होत असल्यानेही नारळ उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होत असून, नारळांच्या किंमती गगनाला भिडल्या असल्या आहेत.वन, कृषी विभागाच्या सहकार्याची गरजमाकडांचा बंदोबस्त आणि कोळीवर्गीय रोगांवर वेळीच उपाययोजना झाल्यास नारळ उत्पादनाचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यासंदर्भात ग्रामीण भागात कार्यशाळा व शिबिरांचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र, यासाठी वन आणि कृषी विभागाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.