रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा पीक धोक्यात आले आहे. आंबा बाजारात येत असला तरी अद्यापही थ्रीप्सचा प्रादुर्भाव मात्र कायम आहे. शेवटच्या मोहोरावरील थ्रीप्सचे किडे फळांवर ओरखडे पाडत आहेत. त्यामुळे आंब्याचा आकार चिकूसारखा झाला आहे. ऋतूचक्रातील बदलामुळे आंबा पिकाला दरवर्षी संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी थंडीमुळे चांगला मोहोर आल्यानंतर बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, आंबा अत्यल्प असल्याने पुन्हा आर्थिक दृष्टचक्राला सामोरे जावे लागणार आहे.
कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. सध्या २५ ते ३० हजार पेटी विक्रीला येत असली तरी गतवर्षीच्या तुलनेत ही आवक निम्मीच आहे. आंबा कमी आहेच शिवाय दरही घसरलेले आहेत. १५०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटी विक्री सुरू आहे. यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. पालवीवर तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव राहिला. त्यासाठी हवामानाचा अंदाज घेत शेतकºयांनी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणीदेखील केली.
डिसेंबरमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे फुलोरा आला. मात्र, सर्वाधिक थंडीमुळे दुबार मोहोराचे संकट उभे राहिले. फुलोºयाने डवरलेल्या झाडांकडे पाहून शेतकरी समाधानी होते. मात्र, दुबार मोहोरामुळे फळगळ झाली शिवाय थ्रीप्स, तुडतुड्याबरोबर बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा परिणाम पिकावर झाला. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी आंबा उत्पादन फारच कमी आहे. एप्रिल सुरू झाला तरी थ्रीप्स हटत नसल्याने शेतकºयांना उघड्या डोळ्यांनी नुकसान सहन करावे लागत आहे.
हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबत युरोपिय देशांपाठोपाठ यावर्षीपासून आखाती देशांनीही घेतलेल्या कडक भूमिकेमुळे शेतकरी सजग झाले आहेत. थ्रीप्स रोग पिकाचे नुकसान करीत असला तरी कीटकनाशकांची फवारणी केल्यास औषधांचा रेसिड्यू फळात उतरण्याचा धोका असल्यामुळे शेतकरी फवारणी करणे टाळत आहेत. परंतु, फवारणी न केल्यास थ्रीप्समुळे पिकाची हानीही होत आहे. मात्र, कृषी विभाग निद्रीस्त असून, शेतकºयांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.