चौके : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीमध्ये आलेल्या महापुरामध्ये काही कुटुंबाचे घरगुती साहित्य आणि घरांचे नुकसान झाले आहे. परंतु या महापुरामुळे सर्वाधिक आणि व्यावसायिक नुकसान झाले आहे ते शंकर नारायण नार्वेकर आणि कुटुंबीयांच्या बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या कारखान्याचे. पुरामध्ये वाहून गेलेले आणि पाण्यात भिजून वाया गेलेले सामान यांचा तपशील काढल्यानंतर सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शंकर नार्वेकर यांच्या निदर्शनास आले. एवढे मोठे नुकसान भरून काढून पुन्हा व्यवसाय उभा करणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.काळसे बागवाडीमध्ये कर्ली नदीकिनारी शंकर नार्वेकर आणि कुटुंबीयांचा बाळराजे फायबर आणि बोट बिल्डर्स या नावाने फायबरच्या व लाकडी बोटी बांधणे व दुरुस्ती करण्याचा व्यवसाय आहे. गेली १२ वर्षे हा व्यवसाय ते करतात या व्यवसायामुळे काही स्थानिक लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. परंतु ६ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजता कर्ली खाडीला आलेल्या महाभयंकर पुरामुळे होत्याचे नव्हते झाले आणि नार्वेकर कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या या महापुरामध्ये २ नवीन बनविलेल्या रेती बोटी, १९ फुट लांबीचे ६ पगार ( छोट्या होड्या), २७५ नग प्लायवूड, १५२ कॅन रेक्झीन, ५५ मॅट बॉक्स ( रोल ), वेगवेगळ्या आकाराचे ४९ फोम, २५०० घनफूट लाकूड सामान, ५५ फुट लांबीचा फायबर मोल्ड ( साचा ), २ मोडलेले मोल्ड आणि १० बेल्ट एवढे सर्व सामान वाहून गेले तसेच जनरेटर, इलेक्ट्रिक कटर, तसेच इतर मशिन आणि विद्युत उपकरणे पुराच्या पाण्यात भिजून नादुरुस्त झाली.अशाप्रकारे वाहून गेलेले आणि नादुरुस्त झालेले सर्व सामान ४0 लाख रुपये किमतीचे होते अशी माहिती शंकर नार्वेकर यांनी दिली. तर काही सामान वाडीतील तरुणांनी आणि शेजारील सहाकाऱ्यांनी धाडसाने पकडले त्यामुळे काही साहित्य वाहून जाण्यापासून वाचवता आले.
यावेळी संदिप शिंग्रे, सचिन सावंत, अरुण शिंग्रे, संदिप गुराम, पिंट्या परब, ललित खोत, अक्षय घाडी, बबलू खोत, बबलू जावकर, वैभव घाडी, दाजी घाडी, विष्णू नांदोस्कर, आना परब, गुणेश घाडी, विशाल राणे, पिंट्या नार्वेकर, शिवा मेस्ता, सुनिल मेस्ता, वासुदेव मेस्ता, लक्ष्मण माड्ये, नाना खोत, जयेश वाडकर, अरविंद खोत, सचिन खोत, अमित खोत, वासुदेव मेस्ता यांनी मदतकार्य करून काही सामान वाहून जाण्यापासून वाचवले. तरीही एवढे लाखो रुपयांचे नुकसान भरून काढणे ही शंकर नार्वेकर यांच्यासमोरील मोठी समस्या आहे.