सावंतवाडी : विकास आणि पर्यावरणाची सांगड घालायची म्हणजे खूप कठीण आहे. दैनंदिन जीवनातील पदार्थच नष्ट झाले तर पुढे काय होणार? सिंधुुदुर्ग जिल्ह्यात कचऱ्याची समस्या मोठी आहे. कुडाळ शहरातील सर्व कचरा भंगसाळ नदीत जाळला जातो. त्यामुळे नदीपात्राला धोका निर्माण झाला आहे. पुढील आपत्ती टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अॅड. असीम सरोदे यांनी केले. येथील ‘फ्रूट अॅण्ड फ्लॉवर’ महोत्सवात रविवारी सायंकाळी ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि कोकणाची जैवविविधता’ या परिसंवाद कार्यक्रमात अॅड. सरोदे बोलत होते. यावेळी अॅड. सुहास सावंत, क्लार्ड अरवा, प्रा. बाळकृष्ण गावडे, नगराध्यक्ष बबन साळगावकर, आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या तुलनेने सावंतवाडीत कचऱ्याचे ढीग नाहीत. शहरात चांगली स्वच्छता दिसून येत आहे. मात्र, अन्य ठिकाणी कचऱ्यांचे आगार आढळून येत आहेत. राजकारणातूनच कचऱ्याचा उगम झाला आहे. त्यामुळे नगरपालिका, महानगरपालिकांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असेही यावेळी अॅड. सरोेदे यांनी सांगितले. जैवविविधता टिकली पाहिजे. पर्यावरण विषय समजून घेणे कठीण आहे. पर्यावरण हा आपला अविभाज्य घटक आहे. पर्यावरण संवर्धनाविषयी प्रशिक्षण दिले जात नसल्याबाबत अॅड. सरोदे यांनी खंत व्यक्त केली. गावपातळीवर जैवविविधता मंडळे स्थापन करणे आवश्यक आहे. गावचे नैसर्गिक स्रोत गावाच्या मालकीचे असणे आवश्यक आहे. जैवविविधता मंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. सध्या जैवविविधता मंडळावर अध्यक्ष नाही. यासाठी राज्य सरकारकडून निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांना पत्र द्या, असे अॅड. सरोदे यांनी सांगितले. पोलिसांना खून, अपघात, चोरीचे कायदे वगळता अन्य कायद्यांचे ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना अॅडव्हान्स कायद्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पर्यावरण विषयावर काम करणे कठीण झाले आहे. वाळू माफियांपासूनही पोलीस संरक्षण घ्यावे लागत आहे. यावरून परिस्थितीचा अंदाज येतो. पूल, इमारती झाल्याच पाहिजेत. याला आमचा विरोध नाही, परंतु पर्यावरणाला बाधा पोहोचवून कामे करणे चुकीचे आहे, असे यावेळी अॅड. सरोदे यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकार महेंद्र पराडकर यांच्या ‘सागरी अभयारण्य-एक अनुत्तरीत प्रश्न’ व ‘मच्छिमार जगत पर्ससीन नेटवरील हल्लाबोल’ या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. (वार्ताहर)शासनाने बेरोजगारांना काम द्यावेगुजरात नर्मदा डॅमजवळ आदिवासी वस्ती पाडून सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा उभारण्यात येत आहे, त्या ठिकाणी वल्लभभार्इंचे विचार शिकण्यासाठी कोणीही जाणार नाही, तर मौजमजा करण्यासाठी लोक जाणार आहेत. यामुळे प्रतिष्ठेचा प्रश्न पुतळ्यापासून न करता बेरोजगारांच्या दोन्ही हाताला काम देऊन करा. स्त्रियांच्या संरक्षणाची काळजी पंतप्रधानांनी करणे आवश्यक असल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केले.
कचरा समस्येमुळे नदीपात्रांना धोका
By admin | Published: May 05, 2015 9:36 PM