तळेरे : ओखी चक्रीवादळामुळे तळेरे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असून मंगळवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. गेले दोन दिवस या परिसरात वारा सुटला आहे. पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणांचे वातावरण बदलले असून मंगळवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर दिवसभर मोठ्या प्रमाणात वारा वाहत होता. यामुळे वादळसदृश स्थिती दिसून येत होती.मंगळवार हा तळेरेचा आठवडा बाजार असल्याने बाजार भरेल का याबाबत शंका होती.
प्रशासनाने सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर केली आणि वेधशाळेने वादळ होण्याची शक्यता व्यक्त केली होती. तरीदेखील बाजार बऱ्यापैकी भरलेला होता.
मंगळवारी सकाळी ७ वाजता व त्यानंतर ९ वाजण्याच्या सुमारास तुरळक पाऊस पडला. मात्र सायंकाळी ५ वाजता चांगला पाऊस पडला. यामुळे एकच तारांबळ उडाली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करायला घेतली. मात्र दिवसभर सुटलेल्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.