अनंत जाधव - सावंतवाडी शहरात सतत घडणाऱ्या घरफोड्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. या चोऱ्यांमध्ये बाहेरील व्यक्तीबरोबरच स्थानिकांचा हात असण्याची दाट शक्यता आहे. मौजमजेचे जीवन जगणारे युवक व जिल्ह्यात सुरू असलेले वाढते अवैध धंदेच या चोऱ्यांना कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.सावंतवाडी शहरात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात चोरीचे सत्र सुरू आहे. चराठा भागात तर बंद घरांनाच चोरट्यांनी लक्ष केले. मात्र, या घरात त्यांना कोणतीही चीजवस्तू मिळाली नसली तरी चोरट्यांनी आपली जरब निर्माण करीत पोलिसांच्या नाकात दम आणला आहे. त्यातच खासकिलवाडा भागात तर चोरट्यांनी दोन बंगले फोडले तर शनिवारी बाहेरचावाडा येथील घरातून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने लंपास केले आहेत. अशा घडणाऱ्या चोऱ्यांमुळे सावंतवाडी पोलीस चांगलेच हैराण झाले आहेत.कणकवली चोरीप्रकरणी अनेक उच्चशिक्षित युवक अडकले असल्याने यावरून हे युवक ऐषआरामाचे जीवन जगण्यासाठी चोरीचे अस्त्र उचलत असल्याचे दिसून येत आहे. उच्चशिक्षित असल्याने कोणाचे आपल्यावर लक्ष जाणार नाही. त्यामुळे आपण सहजरीत्या चोरी करून सुटून जाऊ, असे या युवकांना वाटत आहे. काही युवक जीवन ऐषआरामी करण्यासाठी चोरी करीत आहेत, तर काही युवकांना मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा नाद लागल्याने ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. तसाच प्रकार सावंतवाडीतही होऊ शकतो. कारण परिसरात अनेक अवैध धंदे चालत आहेत. यात जुगार, मटका, आदी अवैध धंद्यांच्या आहारी काही युवक गेले असून, या धंद्यांसाठी लागणारा पैसा कोठून उभा करायचा, असा प्रश्न या युवकांपुढे पडतो. मग काही युवक या धंद्यासाठीही चोरी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे आदर्श कोणाचा ठेवावा, असा पोलिसांपुढे प्रश्न असून, सावंतवाडीतील चोऱ्यांमध्ये स्थानिक नसतील, पण या चोऱ्या रोखण्यासाठी उपाय तरी काय आहेत अशी हतबलता पोलिसांपुढे आली असून, ते अनेक प्रकरणांत चाचपडत तपास करीत असल्याचे दिसून येत आहेत.महत्त्वाचे नाके बेभरवशीरात्रीच्या गस्तीबरोबरच पोलिसांनी शहरात दिवसाची गस्त ही मोठ्या प्रमाणात वाढविली आहे; पण जे महत्त्वाचे नाके आहेत त्या नाक्याची सुरक्षा बेभरवशाची बनली आहे. काही नाक्यांवर तर पोलिसांऐवजी होमगार्डच आहेत. काही नाक्यांवर तर महिला पोलीसांचीच ड्यूटी लावली आहे. पण, त्या मोबाईलवरच ड्युटी करीत असल्याने अनेकवेळा चोरीचे गंभीर गुन्हे घडत असून, ही त्याबाबत नव्या व्यक्तींवर, गाड्यांवर लक्ष ठेवणे या पोलिसांना जमत नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती जरी चोरीच्या उद्देशाने शहरात आले असले तरी त्यांच्या हालचाली टिपणे अवघड काम असते.
वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांना डोकेदुखी
By admin | Published: March 30, 2015 8:41 PM