कुडाळ : पिंगुळी-म्हापसेकरनगर येथील वीज वितरण कंपनीच्या दोन धोकादायक विद्युत खांबांकडे वीज वितरण कंपनीने केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याचे गांभीर्य ओळखून विद्युत वितरण कंपनीने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरू असून याबाबत ग्राहकवर्गात कमालीचा संताप आहे. वाढती वीज बिले, विजेचा लपंडाव यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात शहराबरोबर ग्रामीण भागातीलही विद्युत खांब गंजलेल्या, जीर्ण झालेल्या अवस्थेत आहेत.
हे खांब वादळी वाºयाने कोणत्याही क्षणी कोसळून वित्त आणि जीवितहानी होऊ शकते. मात्र, या गंभीर बाबीकडे वीज वितरण कंपनीचे सातत्याने दुर्लक्षच होत आहे. या समस्यांबाबत निवेदने देऊनही अधिकारीवर्ग सुशेगाद आहे. केवळ वीज बिलांची वसुली करण्यामध्ये कंपनी गुंतली असून, जीर्ण झालेल्या विद्युत खांब, वाहिन्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्राहकांतून होत आहे.
कार्यवाहीची मागणी
पिंगुळी-म्हापसेकरनगर येथील ग्राहकांना जीर्ण झालेल्या दोन खांबांच्या धोक्याखाली वावरावे लागत आहे. या दोन्ही खांबांवरून ३३ केव्हीची विद्युत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच दोन वीजवाहिन्यासुद्धा धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
पिंगुळी-म्हापसेकरनगर येथील धोकादायक विद्युत खांब तत्काळ बदलण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.