कुडाळ : दोडामार्ग येथील शिक्षकांची विमा हप्त्याची रक्कम कोठे गेली याबाबत तपास करण्यात प्रशासन गेली तीन वर्षे टाळाटाळ करीत असल्याने येथील शिक्षकांच्या विमा हप्त्याच्या रकमेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला.या प्रसिद्धीपत्रकात अणावकर म्हणतात, दोडामार्गमधील काही शिक्षकांच्या मासिक वेतनातून कापून घेतलेली आयुर्विमा हप्त्याची रक्कम संबंधित शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली नसून रकमा गेल्या कोठे ? गेल्या तीन वर्षांत तपास करण्यास शिक्षण विभाग प्रशासन टाळाटाळ करीत आहे, अशी माहिती माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीवरून उघड झाले आहे. तळकट शाळा नं. १ येथील गजानन हरमलकर यांच्या जानेवारी २०१२ ते जून २०१२ या सहा महिन्यांत मासिक वेतनातून कापून घेतलेली १६ हजार ५९० रुपये त्यांच्या विमा खाती जमाच केले नाहीत. त्यांची विमा पॉलिसी बंद झाली, तर जिल्ह्यातील आणखी एका शिक्षिकेचे सुमारे २० हजार रुपये आयुर्विमा खात्यात जमा केलेले नाहीत. हे प्रकार सन २०११ पासून सुरू आहेत.तळकट शाळा नं. १ येथील गजानन हरकलकर यांची बदली वेंगुर्ले येथील मातोंड बांबर नं.५ येथे झाली. ते ४ जुलै २०१४ पासून या शाळेत हजर झाले. दोडामार्ग शिक्षण विभागाने हरमलकर यांचे अंतिमवेतन प्रमाणपत्र तत्काळ वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविणे क्रमप्राप्त होते. मात्र, ते चार महिन्यानंतर ३ नोव्हेंबर २०१४ रोजी पाठविले. अंतिमवेतन प्रमाणपत्र उशिरा पाठविल्यामुळे वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी यांनी पाच महिने हरमलकर यांना मासिक वेतन प्रदान केले नाही. दोडामार्ग शिक्षण विभागाने वेंगुर्ले शिक्षण विभागाकडे जे अंतिमवेतन प्रमाणपत्र पाठविले आहे. त्यात १ ते ३ जुलै २०१४ या तीन दिवसांचे वेतन हरमलकर यांना प्रदान करण्यात आले, असे कळविले होते. यातील धक्कादायक प्रकार म्हणेजे आजपर्यंत हरमलकर यांच्या बँकखात्यात तीन दिवसांचे सुमारे ४४०० रु. जमा नाहीत. वेंगुर्ले गटशिक्षण विभागातून माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळविली असून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोडामार्गचे गटशिक्षणाधिकारी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा करून हे सर्व प्रकार निदर्शनास आणले. मात्र, ते कोणतेही समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत, असेही अणावकर म्हणाले. (प्रतिनिधी)शिक्षकांनाच धमकीसंबंधित शिक्षकांनी साधी चौकशी केली तर तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन शिक्षकांना धाक दाखवितात. परजिल्ह्यातील एक शिक्षक आपली लेखी तक्रार द्यायला गेले तर त्यांना असली निवेदने आम्ही वाचत नाही, तर फाडून केराच्या टोपलीत टाकतो, अशी उत्तरे दिली जातात.
शिक्षकांच्या विमा रकमेवर डल्ला
By admin | Published: June 12, 2015 11:16 PM