वैभववाडी : खड्डे भरण्यासाठी आणलेल्या डांबराच्या बॉयलरने बसस्थानकानजिक अचानक पेट घेतला. दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे प्रचंड तारांबळ उडाली होती. खड्डे भरणाऱ्या मजुरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.रोलरच्या सहाय्याने डांबराचा बॉयलर बाजारपेठेतून घेऊन जात असताना बसस्थानकाच्या परिसरात या बॉयलरमधील डांबराने पेट घेतला. त्यामुळे रोलर रस्त्याच्या कडेला थांबविण्यात आला. त्यावेळी अक्षरश: आगडोंब उसळल्याने बसस्थानक ते संभाजी चौकादरम्यान धुराचे लोळ पसरले. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहने काहीकाळ थोपवून धरण्यात आली होती. आगडोंब उसळल्याने प्रचंड तारांबळ उडाली होती.मजुरांनी झाडाच्या ओल्या फांद्या आणि रेतीचा मारा करून सुमारे १० ते १५ मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर डांबराला लागलेली आग आटोक्यात आली. त्यामुळे लगतच्या टपऱ्या आणि वीजवाहिन्या बचावल्या. बॉयलरमधील डांबर थांबून थांबून पुन्हा पेट घेत होते. त्यामुळे रिक्षा स्टॅण्डसह टपरीधारक व बसस्थानक परिसरात काहीशी घबराट निर्माण झाली होती. आग पूर्णत: आटोक्यात आल्यानंतर साऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. (प्रतिनिधी)
डांबराचा बॉयलर पेटल्याने तारांबळ
By admin | Published: December 11, 2014 11:08 PM