सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुका डंपर चालक-मालक संघटनेचे बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन होत आहे. या आंदोलनाला सावंतवाडी डंपर चालक-मालक संघटनेने पाठिंबा जाहीर केलेला आहे. तर आंदोलनात सहभागी होणाऱ्या कुडाळ येथील संभाव्य व्यक्तींना कुडाळ पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांनी नोटिसा बजावल्या आहेत.
डंपर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर व्यासपीठ उभारण्यात आले आहे. काही डंपर सुद्धा येथे आणून ठेवण्यात आले आहेत. मात्र, ४ मार्च २०१६ ची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शीघ्र कृतीदल व पोलीस कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मात्र, अजून आंदोलन करणारे डंपर चालक-मालक मोठ्या संख्येने दाखल झालेले नाहीत.३१ मे २०१८ रोजी वाळू उत्खननाचे बंद केले परवाने अद्याप सुरु केलेले नाहीत. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री, बंदर राज्यमंत्री, जिल्हाधिकारी, सत्ताधारी आमदार व जिल्हा गौण खनिज अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने दिली.
तरीही दुर्लक्ष होत असल्याने १२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर डंपर लावून सर्व मालक धरणे आंदोलन करणार आहेत, असा इशारा कुडाळ तालुका डंपर चालक-मालक संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिला होता. त्याप्रमाणे हे आंदोलन होत आहे.