सुधीर राणे
कणकवली : कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाला यावर्षी २९ सप्टेंबर पासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. त्यामुळे कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली असून त्यानिमित्ताने श्री दुर्गा मातेचा जागर केला जाणार आहे. या उत्सवासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.नवरात्रोत्सवाची नऊ दिवस चालणारी ही धूम एक वेगळेच वातावरण निर्माण करीत असते . सिंधुदुर्गात यावर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्ष सुरु झाल्याने पितरांच्या श्राध्दाचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले होते. त्याचबरोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत होती. दांडिया नृत्य तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तालमी रंगत होत्या.नवरात्रोत्सवात जिल्हयामध्ये सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी श्री दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, तर अनेक ठिकाणी नुसतेच गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.कोकणामध्ये पूर्वी नवरात्रोत्सव मर्यादित होता. मात्र, काळानुसार त्यात आता बदल होत आहेत. ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणून तिची स्थापना करून, दांडियाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तर काही ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना न करताच दांडिया,गरबा खेळला जात असल्याचे चित्र पहायला मिळते.शहरांमध्ये मात्र गल्लोगल्ली नवरात्रोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. राजकीयदृष्टया जनतेच्या जवळ जाणारा हा उत्सव असल्याने राजकारणीही मोठय़ा संख्येने या उत्सवांना मदतीचा सढळ हस्ते हात देत असल्याचे दिसून येते.पारंपारिक पध्दतीने गरब्याचे आयोजन प्रामुख्याने गुजराती वस्ती असणा-या ठिकाणीच मोठया प्रमाणात होत असते. मात्र ,जिल्हयातील प्रमुख शहरांसह काही पंचक्रोशींच्या ठिकाणीही असे कार्यक्रम अलीकडे केले जात असल्याचे दिसून येते. कणकवली शहरातही मागील काही वर्षात नवरात्रोत्सव मोठया प्रमाणावर साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. नवरात्रोत्सव मंडळांसह अनेक ठिकाणी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याने या उत्सवाची रंगत आणखी वाढत आहे.दांडिया स्पर्धेत विशेष करून युवा पिढीचा सहभाग अधिक असल्याने राजकीय मंडळीही या उत्सवाचा राजकीय फायदा करून घेण्यास पुढे सरसावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या स्पर्धांची भव्यता आणखीनच वाढते. यावर्षी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने त्याचा परिणाम नवरात्रोत्सवावर झालेला पहायला मिळणार आहे. राजकीय व्यक्ती आपल्या निवडणुकीचा प्रचार गर्दीचा फायदा घेऊन खुबीने करून घेणार आहेत. तरुणाईला ' कॅच ' करण्यासाठी या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तींकडून केला जाणार आहे.सिंधुदूर्गातील अनेक मंदिरात दसऱ्या पर्यन्त देवीचा जागर केला जाणार आहे. भजन, पूजन आदी धार्मिक विधि यानिमित्ताने होणार आहेत. त्याची तयारी सध्या सुरु आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाच्या नऊ रात्री आता जागविल्या जाणार आहेत.बाजारपेठांमध्ये साहित्य दाखल!नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लागणारे साहित्य बाजारपेठेत हळहळू दाखल होऊ लागले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने रंगणाऱ्या दांडिया, गरबा तसेच इतर कार्यक्रमाच्या वेळी इतरांपेक्षा आपला 'लुक' वेगळा असावा यासाठी तरुणाई प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचा कल तसेच आवड़ बघुन विविध स्टाईलचे कपड़े तसेच साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.आचारसंहितेचा बसणार फटका!विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. बऱ्याच नवरात्रौत्सव मंडळाशी राजकीय व्यक्तींचे संबध असल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. मात्र त्यांना कोणतीही आश्वासने नागरिकांना देता येणार नाहीत.