कुडाळ : पंतप्रधान मोदींच्या काळात देशात ३ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर एकट्या महाराष्ट्रात ७० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मोदी सरकारने मागील नऊ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना एकही पॅकेज दिले नाही, महागाईवर या सरकारचे नियंत्रण नाही, या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट सरकार आहे. देशात बेरोजगारीचा भस्मासुर वाढला आहे मोदी सरकार जाहिरातदारांचे सरकार असल्याचे टीका अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष इरशाद शेख, विकास सावंत, अभय शिरसाट, चंद्रशेखर जोशी, संतोष मुंज, साईनाथ चव्हाण, सुंदर सावंत, अरविंद मोंडकर, विभावरी सुखी, अमिदी मेस्त्री आदी कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी ३ हजार ७०० किलोमीटरची पदयात्रा काढली होती याला एक वर्ष पूर्ण झाले. या यात्रेचे संदेश देशभर देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी डॉ. भालचंद्र मुंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत विरोधी पक्षाने इंडिया नाव ठेवले म्हणून देशाचे नाव बदलण्याची गरज होती का असा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही यामध्ये फरक करत २०१४ पासून या देशांमध्ये संसदीय लोकशाहीच्या बुरख्याखाली अध्यक्षीय लोकशाही सुरू केली आहे अशी टीका केली.युवक रोजगाराच्या प्रतीक्षेतरुपयाची किंमत घटली असून महागाई वाढली आहे. त्यामुळे या सरकारचे महागाईवर नियंत्रण नाही. कांद्याचा निर्यातीवरील कर वाढल्याने देशामधील कांद्याची किंमत वाढली आहे. यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागला. महागाईवर या देशाच्या सरकारचे नियंत्रण नाही, तर व्यापाऱ्यांचे या सरकारवर नियंत्रण आहे. रोजगार देण्याच्या बाबतीत या सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र देशातील ४१ कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याचेही डॉ. मुणगेकर म्हणाले. निवडणुकीला सहा महिने असताना एक देश एक निवडणुकीची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला.
मोदी सरकारच्या काळात देशात बेरोजगारी वाढली, अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकरांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 1:28 PM