अनंत जाधव- सावंतवाडी -मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या आरामबस व्यावसायिकांनी सावंतवाडीला ठेंगा दाखवत मुंबई व्हाया झाराप टू गोवा असा मार्ग पत्करल्याने अनेक चाकरमानी भाविकांमधून नाराजीचा सूर उमटत आहेत. त्यातच हे आरामबसधारक तिकिट देतात सावंतवाडीचे आणि उतरवतात मात्र झाराप येथे, मग आमचे तिकिट सावंतवाडीपर्यंत का घेतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत वेळोवेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आरामबसधारक बिनधास्त झाले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर यांनी आवाज उठविला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या आरामबस यापूर्वी सावंतवाडीतून जात असत. पण अलिकडे झाराप- पत्रादेवी महामार्ग सुरू झाल्याने आता या महामार्गावरूनच आरामबस वळवल्या जात आहेत. त्या सावंतवाडीकडे पाठ करीत झाराप येथून थेट गोवा गाठतात. अनेक वेळा यावरून वादही झाला आहे. मुंबईतील एका महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. पण पोलिसांना अधिकार नसल्याने त्यांनी ही तक्रार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे वर्ग केली. मात्र, त्यांनी अद्यापपर्यत यावर कोणतीही कारवाई केली नाही.आरामबसधारक हे बहुतांशी मुंबई व गोव्यातील आहेत. ते मुंबईतून येताना झाराप मार्गे गोव्याला जातात. परंतु गोव्यातून येताना मात्र तिकिट बुकिंग असल्याने सावंतवाडीतून येतात. मग हा मार्ग त्यांना कसा काय चालतो, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच गणेश चतुर्थीनिमित्त अनेक चाकरमानी कोकणात येत असतात. त्यांना काही आरामबसधारकांनी झाराप, तर काहींनी बांदा येथे उतरविल्याने चाकरमान्यांमधून संताप व्यक्त होत असून अशा आराम बसधारकांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.परिवहन विभाग गप्प का?याबाबत अनेक वेळा रितसर तक्रारी करूनही उपप्रादेशिक परिवहन विभाग गप्प आहे. मुुंबईतून सावंतवाडीचे तिकिट घ्यायचे आणि त्यांना झाराप येथे अर्ध्यावरच उतरवायचे. हा प्रवाशांवर होणारा अन्याय आरटीओ विभागच सोडवणार. मग ते आरामबसधारकांविरोधात लेखी तक्रारी येऊनही गप्प का, असा सवाल उपस्थित होत आहे.वसंत केसरांकराकडून आंदोलनाचा इशारासावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर यांनी प्रवाशांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसे पत्रक त्यांनी जारी केले असून हा सावंतवाडीवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावेचाकरमान्यांवरच अन्याय होत नाही, तर अनेकवेळा सावंतवाडीसह अन्य भागातील ग्रामस्थांवरही हे आरामबसधारक अन्याय करीत असल्याचे दिसून येते. राजकारणी लोक स्वत:च्या गाड्यांमधून प्रवास करीत असतात. त्यांना आमच्या समस्या काय समजणार, असा संतापजनक सवाल काही चाकरमानी व्यक्त करीत आहेत. आता विधानसभा निवडणूक येत आहे. त्यांच्याकडून यावर तोडगा काढून घ्यावा. आम्ही झाराप व बांदा येथे उतरून रिक्षांना हजार रुपये मोजायचे का? की एसटीची वाट बघत बसायची, असा सवाल चाकरमानी उपस्थित करीत आहेत.
आरामबस चालकांची दादागिरी
By admin | Published: September 01, 2014 9:39 PM