चिपळूण : येथील प्रसिध्द ग्रामदेवतेचे मूर्तिकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप घनश्याम लवेकर यांनी इकोफ्रेंडली पद्धतीने आपल्या शेतात गणपतीचे विसर्जन करून पर्यावरण संवर्धनात खारीचा वाटा उचलला. गेली दहा वर्षे लवेकर कुटुंबीय हा उपक्रम राबवत आहेत.राष्ट्र सेवा दलाच्या तालमीत तयार झालेले लवेकर समाजवादी विचारांचे पायिक आहेत. अंधश्रध्दा निर्मूलन समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती व सेवा दलाच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. गणेश मूर्तीला असणारे रंग, मूर्तीची माती यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. हे प्रदूषण टळावे, या उद्देशाने त्यांनी आपल्या शेतात प्लास्टिकच्या टबमध्ये पाणी ओतून त्यामध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केले. दुसऱ्या दिवशी हे विसर्जनाचे पाणी शेतातील झाडांना घातले, तर निर्माल्य गांडूळ खतासाठी वापरले. या झाडांना येणाऱ्या फळा, फुलांच्या माध्यमातून गणराय आपल्याला दररोज दर्शन देईल, अशी त्यांनी भावना व्यक्त केली. पुढच्या वर्षी आपण मोठा टँक तयार करुन त्यामध्ये इतरही नागरिकांना येथे गणेश विसर्जनाची संधी निर्माण करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मुलगे कुणाल व श्रेयस लवेकर, राजश्री लवेकर, रश्मी लवेकर, सौरभ लवेकर यांच्यासह चंद्रशेखर कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतात इको फे्रंडली गणेश विसर्जन
By admin | Published: September 16, 2016 9:46 PM