सावळाराम भराडकर ल्ल वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळी येथील प्रगतशील शेतकरी दत्ताराम लक्ष्मण खोत यांनी आपल्या कौशल्य व मेहनतीने कृषीक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बांबू पिकाची लागवड करून एक पाऊल आर्थिक उन्नतीच्या दिशेने पुढे टाकले आहे. सिंधुदुर्गात पारंपरिक भातशेती केली जाते. मात्र, खोत यांनी २०१२ साली त्यांच्याकडील एकूण ८ एकर क्षेत्रामधील ६ एकर क्षेत्रात बांबू लागवड केली. तर उरलेल्या २ एकर क्षेत्रात नारळ व सुपारीचे पीक घेतले. बांबू लागवड करताना ‘माणगा’ व ‘भोवर’ या जातींची लागवड त्यांनी केली. बांबू वाढीसाठी अडथळा होऊ नये, म्हणून ९७१.२१ फुटांच्या अंतरावर लागवड केली. रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रीय खतांचा वापर करत कीटकनाशकांची फवारणीही केली नाही. एका बेटापासून ५ वर्षात किमान २० बांबू मिळतात. बांबू लागवडीच्या पहिल्याच वर्षी आंतरपीक म्हणून काकडीचे उत्पन घेतल्याने त्यांची आर्थिक आवकही चांगली झाली. एका काकडीला बाजारात साधारणत: ६ ते ७ रुपये दर मिळतो. बांबूसाठी पुणे, नाशिक, सांगली, कर्नाटक ही बाजारपेठ उपलब्ध असून, लांजा व दापोली येथील व्यापाऱ्यांनाही बांबूचा पुरवठा केला जातो. कृषीक्षेत्रातील भरीव योगदानामुळे खोत यांना ‘कृषीभूषण’ व ‘सुवर्णकोकण’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या बांबू पीक लागवडीची सखोल शास्त्रोक्त माहिती नुकतीच छत्रपती महाविद्यालय, किर्लोस-ओरस यांच्या ग्रामीण कृषी कायार्नुभव उपक्रमांतर्गत कृषीकन्या हर्षदा नाईक, मोनिका तवटे, अनघा कोयंडे, ऐश्वर्या कुरणे, आदींनी घेतली.
बांबू पिकातून आर्थिक उन्नती
By admin | Published: September 25, 2016 11:14 PM