श्रीकांत चाळके -- खेड लोटे औद्यौगिक वसाहतीसाठी इथल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जागा कवडीमोल दराने दिल्या आहेत़ मात्र, त्या प्रमाणात त्यांना भरपाई आणि रोजगार मिळाला नाही़ येथील कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात प्रदूषण केल्याने येथील भातशेतीसह फळफळावळ आणि मासेमारीवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. माशांची मोठ्या प्रमाणात मरतूक होऊ लागल्याने हा समाज या व्यवसायापासून दुरावत चालला आहे़ यामुळे भोई समाजाची कौटुंबिक अर्थव्यवस्था पार कोलमडून पडली आहे.लोटे येथील भोई समाजाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन म्हणून मासेमारी हा व्यवसाय होता. आजही या व्यवसायाकरिता हा समाज अन्यत्र भटकंती करत आहे. लोटे येथील जवळपास ५५ कंपन्यांचे सांडपाणी येथील नदी आणि खाडीमध्ये सोडले जात आहे. अजगणी, कोंंडीवली, लोटे घाणेखुंट आणि संपूर्ण खाडीपट्टा परिसरातील खाडी आणि नद्यांमध्ये हे प्रदूषित पाणी मिसळत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात मेलेले मासे पाण्यावर तरंगताना दिसतात.अनेकवेळा तलाठी आणि तहसीलदार यांच्यासमोर या प्रकाराचा पंचनामा झाला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या अक्षम्य कारभाराचा पाढा या मासेमारी व्यावसायिकांनी अनेकवेळा वाचला. मात्र, येथील प्रदूषण मंडळांतील अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक नाही. आता खेडचे आमदार रामदास कदम पर्यावरण मंत्री आहेत. त्यांनीच याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.खाडीपट्ट्यामध्ये या मासेमारीला कोणतेही अन्य पर्यायी साधन नसल्याने मासेमारी कायमचीच बंद होण्याची भिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी येथील शेतकऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी आता न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. मात्र, अजून हा निर्णय प्रलंबित आहे. आता याप्रकरणी भविष्यात काय निर्णय लागतो याकडे भोई समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.भोई समाजातील ग्रामस्थांनी लोटे औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी दिल्या. त्यामुळे आता हा समाजही भूमीहिन झाला आहे. या समाजाकडे कोणाचेही लक्ष नसल्याने समाज विकासापासून वंचित राहिला आहे. शासनाने याकडे लक्ष पुरवण्याची मागणी होत आहे.
भोई समाजाची अर्थव्यवस्था कोलमडली
By admin | Published: September 07, 2015 11:15 PM