रत्नागिरी : जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचे मूल्यांकन करण्यात यावे. त्यामुळे उपक्रमांचे यशापयश समोर येईल, त्यातील त्रुटी दूर करता येतील. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भविष्यकालीन नियोजन अधिक सुटसुटीत करता येईल, असा विश्वास राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. ए. आठल्ये, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, चिपळूणच्या नगराध्यक्षा सावित्री होमकळस, राजापूरच्या नगराध्यक्षा मीना मालपेकर, खेडच्या नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये, दापोलीचे नगराध्यक्ष जावेद मणियार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास प्राधान्य देण्यात यावे. शिक्षण विभागाच्या या शैक्षणिक उपक्रमांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्यात येईल. शालेयस्तरावर शासकीय योजनांची अंमलबजावणी ही विद्यार्थ्यांची प्रगती केंद्रस्थानी ठेवून करायला हवी. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देतानाच त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्यदेखील उपलब्ध व्हायला हवे. विद्यार्थ्यांना आवश्यक गणवेश, चांगल्या दर्जाचे शैक्षणिक साहित्य देण्यासाठी गरज पडल्यास प्रशासनाकडून निधी दिला जाईल. अपंग विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना सहाय्यभूत ठरणारे साहित्य उपलब्ध करावे. यासाठी प्रशासनाकडून आणि वैयक्तीक पातळीवरुन आवश्यक मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजीटल क्लासरुम, विद्यार्थी गुणवत्ता वाढ अशा क्षेत्रांमध्ये सहभागी होेऊ इच्छिणाऱ्या स्वंयसेवी संस्थांना विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घ्यावे. हे करत असतानाच जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमांचे मूल्यांकन करण्यात यावे. याद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भविष्यकालीन आवश्यक नियोजन करण्यास सहाय्य होईल, असे वायकर म्हणाले.(प्रतिनिधी)महावितरण, म्हाडाचा आढावासकाळच्या सत्रात पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी महावितरणमार्फत राबविण्यात येणाऱ्या व नव्या गृहनिर्माण धोरणाच्या अनुषंगाने म्हाडाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविता येऊ शकणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. पोलीस वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या सहकार्यातून कशाप्रकारे करता येऊ शकेल, याबाबतही माहिती घेतली.
शाळांमधील शैक्षणिक उपक्रमांचे मूल्यांकन हवे
By admin | Published: November 23, 2015 11:19 PM