कणकवली: राज्य शासनाने शिक्षणाच्या बाबतीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सुड उगविण्याचे धोरण अवलंबिले आहे. राज्याचे शिक्षण मंत्री हे सिंधुदुर्गातील असतानाही त्यांनी येथील शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. असा आरोप करतानाच राज्य सरकारच्या चुकीच्या प्राथमिक शिक्षक बदली धोरणामुळे जिल्ह्यातील ३८९३ पैकी ११४० शिक्षकांच्या जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १२० प्राथमिक शाळा शिक्षकाविना असणार आहेत. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले. तसेच याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आपण भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात बेरोजगार असलेल्या डी.एड., उमेदवारांना शिक्षण स्वयंसेवक या पदावर घेऊन त्यांना जिल्हा परिषदेतून मानधन द्यावे अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते,सतीश सावंत, अतुल रावराणे , युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,सचिन सावंत ,राजू राठोड,विलास गुडेकर ,बंडू ठाकूर, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.राऊत म्हणाले, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि खासगी शाळा येत्या १५ जूनला सुरू होत आहेत. मात्र, जिल्ह्यातील पालकांमध्ये शिक्षणाबाबतची गंभीर चिंता निर्माण झाली आहे. कारण राज्य सरकारचे शिक्षक बदलीचे आडमुठे धोरण त्याला कारणीभूत ठरले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून कोकणवर सूड उगविण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे.जिल्ह्यामध्ये जे शिक्षक होते ते आता स्वतःच्या जिल्ह्यामध्ये गेले आहेत. जिल्हा बदली बरोबरच काही शिक्षक सेवानिवृत्त झाले. यामुळे जिल्हा परिषदेच्या शेकडो जागा शिक्षकाविना राहणार आहेत. कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे शाळांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. येत्या ३०जूनला १३ शिक्षकही सेवानिवृत्त होत असल्याने साधारण ११४० जागा रिक्त होतील.राज्याचे शिक्षणमंत्री असलेल्या या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचे हे कटकारस्थान रचले गेले आहे. यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपला डाव साधणार आहेत .