मालवण : राष्ट्रवादीचे तत्कालीन तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध मालवण न्यायालयात दावा सुरू होता. त्याचा निकाल सोमवारी लागला असून काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष सनी कुडाळकर यांच्यासह सहाजणांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. तक्रारदार सपना मांजरेकर यांनाही न्यायालयाने फटकारत शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, या दाव्याच्या निमित्ताने आरोपीसह तक्रारदाराला शिक्षा देण्याचा पहिलाच प्रकार मालवण येथे घडला आहे. पालकमंत्री नारायण राणे यांचा नोव्हेंबर २०११ मध्ये प्रतीकात्मक पुतळा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळला होता. याबाबत राष्ट्रवादीचे तत्कालीन तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांना जाब विचारण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते गेले होते. यावेळी मांजरेकर यांच्या घरावर दगडफेक करून नुकसानी करण्यात आली होती. या प्रकरणी सपना सुधीर मांजरेकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सनी कुडाळकर, बाबा परब, गोपी पालव, अमोल केळुसकर, बाबा चोडणकर यांचा समावेश होता. या दाव्याचा निकाल सोमवारी लागला. येथील सहदिवाणी न्यायाधीश सुनिल चव्हाण यांनी अशोक सावंत यांच्यासह सहाजणांना प्रत्येकी ३२०० रुपये दंड तसेच कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. तर खोटी साक्ष दिल्यावरून तक्रारदार सपना मांजरेकर हिलाही ५०० रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेस उपाध्यक्षांसह सहाजणांना शिक्षा
By admin | Published: June 17, 2014 12:55 AM