शोभना कांबळे ल्ल रत्नागिरीरक्तदानाइतकेच नेत्रदान महत्त्वाचे आहे. मरणोत्तर नेत्रदानाने एका व्यक्तिचे भविष्य प्रकाशमय होण्यास मदत होते, त्यामुळे दृष्टिदानासारखे दुसरे कुठले पुण्यमय कार्य नाही, हे आता समाजाला हळूहळू समजू लागल्याने जिल्ह्यात मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गतवर्षी २००पेक्षा अधिक व्यक्तिंनी नेत्रदानाचे अर्ज भरले असून, ८ जणांच्या नेत्रदानाने सोळा अंधांच्या नेत्रज्योती प्रज्वलित करून त्यांचे आयुष्य प्रकाशमय केले आहे.नेत्रदानाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यातील एक म्हणजे मृत्यूनंतर आपण किंवा आपला नातेवाईक विद्रुप दिसेल, ही वाटणारी सर्वांत मोठी भीती. यामुळे नेत्रदानासाठी स्वेच्छेने येणाऱ्यांची संख्या अगदीच अल्प होती. मात्र, आता आरोग्य विभागाकडून होत असलेल्या जागृतीमुळे आपले मरणोत्तर नेत्रदान एक किंवा दोन व्यक्तिंना दृष्टी देऊ शकते, याचे महत्व समाजाला कळू लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २००पेक्षा अधिक दात्यांनी स्वेच्छेने मरणोत्तर नेत्रदानाची तयारी दर्शविली आहे. गत वर्षात आठ व्यक्तींनी नेत्रदान केले आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही नेत्रपेढीची सुविधा नाही. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर सहा तासांच्या आत नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांना त्या व्यक्तिची नेत्रबुबूळ काढावी लागतात. त्यातील पेशी जिवंत ठेवण्यासाठी त्यावर पूर्ण प्रक्रिया करून अत्याधुनिक अशा नेत्रपेढीत ठेवावी लागतात. ही सुविधा कोल्हापूर येथे असल्याने नेत्रबुबूळ काढल्यानंतर ते लगेच नेत्रपेढीकडे पाठवले जातात. तिथे ७२ तासांच्या आत ती दुसऱ्या व्यक्तिंसाठी वापरावी लागतात. जिल्ह्यात नेत्रचिकित्सा अधिकारी १८ आहेत. त्यापैकी जिल्हा रूग्णालयात प्रशिक्षीत नेत्रचिकित्सा अधिकारी एकच असून, एकाला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. इतरांनाही टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. नेत्रदान करावयाचे असेल तर जिल्हा शासकीय रूग्णालयात अर्ज भरता येतोच. ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणीही नेत्रदानाचे अर्ज भरता येतात.1नेत्रदानाबाबत प्रबोधन होण्यासाठी त्यांचे समुपदेशन होणे महत्त्वाचे आहे. मात्र, जिल्हा रूग्णालयाच्या नेत्र विभागात सध्या समुपदेशक नसल्याने प्रबोधन करण्यात अडचणी येत आहेत. 2नेत्रदानाबाबत नेत्रदात्याने कुटुंबियांना माहिती देणे गरजेचे आहे. मृत्यूनंतर सहा तासांच्या आता नेत्रबुबूळ काढली गेली तरच त्यांचा उपयोग दुसऱ्या व्यक्तिसाठी होऊ शकतो. हे लक्षात घेऊन कुटुंबियांनीही त्याच्या मृत्यूनंतर त्या व्यक्त[च्या इच्छेचा आदर करीत त्वरित जिल्हा रूग्णालय वा नजीकच्या आरोग्य केंद्राला कल्पना दिल्यास त्याचे नेत्रदान फलद्रूप होऊ शकेल. 3ज्यांना स्वेच्छेने मरणोत्तर नेत्रदान करायचे असेल, त्यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या नेत्रविभागाकडे संपर्क करावा किंवा आपल्या भागातील ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा रूग्णालयाच्या नेत्र विभागातर्फे करण्यात आले आहे. समाजात अंधत्व वा इतर कारणांनी दृष्टीहीन झालेल्यांना अशा नेत्रदात्यांची गरज असते. नेत्रदानाबाबत समाजात गैरसमज असल्याने भीतीही आहे. ती दूर करण्यासाठी सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी समाजात प्रबोधनात योगदान दिल्यास नेत्रदात्यांचे प्रमाण नक्कीच वाढेल आणि अशा अनेक दृष्टीहीनांचे भविष्य उजळेल. त्यामुळे नेत्रदानासाठी इच्छाशक्ती निर्माण होणे गरजेचे आहे.डॉ. सोनाली पाथरे, जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक, जिल्हा शासकीय रूग्णालय
आठजणांच्या ‘नेत्रां’जनाने सोळाजणांनी जग ‘पाहिले’
By admin | Published: June 09, 2015 11:04 PM