अरूण आडिवरेकर ल्ल रत्नागिरीचौथीत शिकणाऱ्या प्रांजल संदीप मोरवसकर हिने थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहिले. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी त्याची दखल घेत तिला अतिशय कौतुकाने उत्तरही पाठवलं. जिल्हा परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती त्यांनी तिला दिली. मुली शिकून खूप मोठ्ठ्या पदावर काम करतात, असं सांगून मिश्रा यांनी प्रांजललाही भरपूर शिकायचं प्रोत्साहन दिलं आहे. ‘थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क’ या उपक्रमांतर्गत आलेल्या पत्राची लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतलेली दखल हा सध्या राजापुरात कौतुकाचा विषय झाला आहे.एखाद्या अधिकाऱ्याला असे पत्र आल्यास सर्वसाधारणपणे शासकीय उत्तर दिले जाते. मात्र लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या पत्राची चांगली दखल घेत कौतुकाने उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी कर्तृत्त्ववान महिलांचा उल्लेख करून प्रांजलला प्रोत्साहितही केले आहे.लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रशासनाचा कारभार गतिमान करण्यासाठी प्रशासकीय कामात अनेक बदल केले आहेत. समाजातील घटकाला आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी थेट आपल्याकडे मांडता याव्यात, यासाठी त्यांनी ‘थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क’ हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. जनतेने मनात कोणतीही भीती न ठेवता आपली गाऱ्हाणी मांडावीत, असा यामागचा उद्देश आहे.या उपक्रमांतर्गत राजापूर शहरातील बंगलवाडी येथील नं. ३ शाळेतील प्रांजल मोरवसकर हिने थेट त्यांना पत्र लिहून मुलींच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत सूचना केली आहे. मुलींच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही तिने म्हटले आहे. तसेच या उपक्रमाचेही कौतुक केले. या उपक्रमात शाळेतील इतरही विद्यार्थिनी सहभागी होण्यास उत्सुक असल्याचेही तिने म्हटले आहे. या उपक्रमामुळे समस्या मांडणे सोपे झाल्याचेही तिने पत्रात म्हटले आहे.या विद्यार्थिनीने पाठविलेल्या पत्राची लक्ष्मीनाराण मिश्रा यांनीदेखील तितक्याच तत्परतेने दखल घेऊन तिच्या पत्राला उत्तर दिले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शाळांना शिक्षक पुरविणे, भौतिक सुविधा, स्वच्छतागृह, पाणी सुविधा, वर्गखोल्या, वीज पुरविली जाते. सर्व मुलांना मोफत गणवेश पुरविणे, शिष्यवृत्तिधारकांना शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई दत्तक -पालक योजना, सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके यांसारख्या योजना देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची असल्याचे मिश्रा यांनी या पत्रात म्हटले आहे.त्याचबरोबर सर्व मुलींनी चांगले शिक्षण घ्यावे, मुलींनी वैयक्तिक स्वच्छता ठेवून आरोग्य चांगले ठेवावे, चांगल्या आरोग्यासाठी वेळ, व्यायाम नियमित करावेत, वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच घराची, परिसराची व गावाचीदेखील स्वच्छता ठेवावी, असे मार्गदर्शनही केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनही खूप शिकता येते, यासाठी स्वत:च्या मनाची तशी तयारी कर, खूप शिकून मोठी हो, आई वडिलांचे, गावाचे व राष्ट्राचे नाव उज्ज्वल कर, असा मौलिक सल्लादेखील त्यांनी तिला दिला आहे. या पत्रात मुली शिकून मोठ्या पदावर काम करत असल्याचे सांगून त्यांनी या पत्रात कर्तृत्ववान महिलांचा उल्लेख केला आहे. तूही असेच काम कर, असा सल्ला देताना तुझ्या जीवनाचे ध्येय काय आहे? हे निश्चित करून मला कळव, असेही त्यांनी त्यात म्हटले आहे.
आठ वर्षीय विद्यार्थिनीच्या पत्राची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून दखल!
By admin | Published: April 20, 2017 10:44 PM