मोदी सरकारची आठ वर्षे सुशासन, गरीब कल्याणाची!, काँग्रेसच्या काळात देशाची बदनामी-नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 12:28 PM2022-06-03T12:28:14+5:302022-06-03T12:30:23+5:30
कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे सावरतो आहे त्यामुळे जनतेने संयम पाळावा. अमेरिका, चीनला मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल.
कणकवली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अकरा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना १८२ लाख कोटी रुपयाचे वाटप मोदी सरकारने केले आहे.कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य,स्वतःच्या कोरोना लस निर्माण केल्या,९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, ३ कोटीहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे , सुमारे तीस लाख फेरीवाल्यांना कर्जपुरवठा करून पुन्हा व्यवसाय उभारण्यात आल्या आहेत. ४१ कोटींहून अधिक जनधन खाती या सारख्या शेकडो योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे असे प्रतिपादन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ८ वर्षे या अभियानाचे औचित्य साधत कणकवली येथील पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते . ते म्हणाले , 'सब का साथ, सब का विकास', 'सब का विश्वास आणि सब का प्रयास 'हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या . त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे , दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली आहे. वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे .
भारतीय अर्थव्यवस्था जगातील वेगाने वाढणारी
भारतासारख्या खंडप्राय देशात लसीकरणाचे आव्हान यशस्वीपणे पेलत मोदी सरकारने प्रगत देशांनाही मागे टाकले . कोरोना काळातच पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवत गोरगरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. या योजनेची जागतिक बँकेनेही प्रशंसा केली आहे. आत्मनिर्भर भारतासारखी संकल्पना प्रत्यक्षात आणल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अशी ओळख झाली आहे.
देश मोदींच्या नेतृत्वात महासत्ता बनेल
आजची जगातील महागाई पाहता श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ असे देश फारच अडचणीत आले आहेत.त्या मानाने भरतात महागाई खूपच आटोक्यात आहे. कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे सावरतो आहे त्यामुळे जनतेने संयम पाळावा अमेरिका, चीनला मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल. असा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला.