रत्नागिरी : ओखा - एर्नाकुलम एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोघांना ८० लाखांना लुटल्यानंतर त्या प्रकरणाचा अवघ्या चार दिवसांच्या काळात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम रेल्वेतून सहजपणे नेण्याच्या या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. झवेरी बाजारात सोन्याचे व्यवहार याच पध्दतीने केले जातात काय, बॅँकिंगद्वारे आर्थिक व्यवहार का झाला नाही, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. तसेच हा एकूणच लुटीचा प्रकार संगनमताने घडला होता का, याबाबतही गूढ निर्माण झाले आहे. २२ मार्चला पहाटे मुुंबईहून एर्नाकुलमला चाललेली ओखा एक्सप्रेस पहाटे ३.३० वाजता रत्नागिरी स्थानकात आली. त्यानंतर दोघेजण या गाडीच्या एस-७ बोगीत आले. केरळला जाणाऱ्या श्रीराम शेडगे व विकास शिंदे यांना त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगत तुम्ही सामान्य श्रेणीचे तिकीट काढून आरक्षित बोगीत कसे बसलात, तुम्हाला साहेबांना भेटावे लागेल, असे सांगून रेल्वेतून उतरविले. त्यानंतर त्यांच्या स्वीफ्ट गाडीतून त्यांना काही अंतरावर नेऊन त्यांच्याकडील ८० लाखांची रक्कम लुटून ते पसार झाले. हा सर्व प्रकार नाट्यमयच होता. केरळमधील जितेंद्र हिंदुराव पवार व सरगर यांच्या सुवर्णपेढीत काम करणारे हे दोन्ही कामगार सोन्याची लगड विकून त्याचे आलेले ८० लाख रुपये केरळला घेऊन जात आहेत, हे ज्या दुकानात सोने विकले तेथील लोकांव्यतिरिक्त अन्य कोणाला माहिती असणे शक्य नव्हते. तेथील कामगार पहिला आरोपी निघाला. त्यातून गुन्ह्याचे धागेदोरे उलगडत गेले. गुन्हा अन्वेषण शाखेने तिघांना अटक करून ६९ लाख ९७ हजार ५०० रुपये हस्तगत केले. परंतु या प्रकरणात जसे कट रचणारे आरोपी आहेत तसेच हे पैसे घेऊन जाणारे दोघेजण ज्वेलर्स मालकांशी खरोखर प्रामाणिक होते काय, त्यांचा या कटाशी काही संबंध तर नाही ना, याचीही खातरजमा होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)तपास सुरूच : आणखी काही संशयित सापडण्याची शक्यता...ऐंशी लाखांच्या लुटीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणातील चौथा आरोपीही रत्नागिरी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतला असून, त्याला मंगळवारी रत्नागिरीत आणले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अत्यंत नियोजनबध्दतेने ऐंशी लाखांची लूट करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात झालेल्या अन्य गुन्ह्यांशीही या आरोपींचा संबंध आहे का, एखादी टोळीच कार्यरत आहे काय, यादृष्टीनेही पोलिसांकडून तपासकाम सुरू आहे. पोलिसांचे अभिनंदन..रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील व त्यांच्या सहकारी पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांच्या काळात दोन गुन्ह्यांचा छडा लावला आहे. पालीत ११ लाखांचे बेकायदा मद्य पकडले व आता लुटीचा पर्दाफाश केला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.
ऐंशी लाखांच्या लुटीचा पर्दाफाश होऊनही गूढ !
By admin | Published: March 28, 2016 11:05 PM