सावंतवाडी : आंबोलीतून कुंभवडेपर्यंत एसटीने आणि तेथून आपल्या खडपडे (चौकुळ) या गावी जात असतानाच गोविंद रामा गावडे (वय ८२) हा वृद्ध अचानक खडपडे येथील जंगलात कोसळल्याने त्याचा तब्बल दोन दिवसांनी शोध लागला आहे. त्यांनी अन्न पाण्याविना चिंब पावसात दोन रात्री या जंगलात काढल्या आहेत. त्यांच्यावर आंबोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असून ते थोडेसे घाबरल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.मंगळवारी गोविंद रामा गावडे हे आंबोलीत आपल्या मुलाकडे आले होते. ते तेथून सायंकाळच्या सावंतवाडी कुंभवडे बसने आपल्या खडपडे या गावी जाण्यास निघाले होते. ते कुंभवडे येथे सायंकाळी पोहोचले.कुंभवडे ते खडपडे हे अंतर तीन किलोमीटरचे असल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे पायी जाण्याचेच पसंत केले आणि ते सायंकाळी एसटी बसमधून उतरून खडपडेकडे चालायला लागले. मात्र, एक किलोमीटरच्या पूर्वीच ते जंगलात कोसळले आणि तेथेच पडून राहिले. आपले वडील मंगळवारी गावी जाण्यास बाहेर पडले. पण ते अद्यापपर्यंत पोचले नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने तसेच अन्य नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. पण ते सापडले नाही.दरम्यान, गुरुवारी आंबोलीहून खडपडेकडे एक ट्रॅक्स गाडी भाडे घेऊन जात होती. त्यांना गोविंद गावडे हे दिसले. त्यांनी खडपडे गावात जाऊन याची माहिती दिली. त्यानंतर गोविंद यांच्या नातेवाईकांनी जंगलात जाऊन त्यांना ताब्यात घेतले. अन्नपाणी पोटात नसल्याने ते बेशुद्धच होते. तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने ते भिजून चिंब झाले होते. त्यांना तातडीने आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐवाळे हे सध्या उपचार करीत असून शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपले वडील मिळाल्याने गावडे कुटुंबही चांगलेच सुखावले आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ वृद्धाने अन्नपाण्याविना जंगलात काढल्या दोन रात्री
By admin | Published: August 07, 2015 11:45 PM