मनोज मुळ्ये - रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्ह्याच्या तळागाळात भक्कम पाया असलेल्या शिवसेनेने सलग तिसऱ्यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याआधीच्या दोन निवडणुकांमध्ये असा प्रयत्न करताना शिवसेनेला अल्प यशावरच समाधान मानावे लागले होते. आता नव्या दमाने या निवडणुकीत उतरण्याचा चंग शिवसेनेने बांधला असला तरी या निवडणुका आल्यानंतरच सहकारात डोकावणाऱ्या शिवसेनेला याहीवेळी कितीसे यश मिळेल, ही शंका आहे. याआधीच्या दोन निवडणुकांप्रसंगी जिल्हा बँकेच्या सत्ताधारी पॅनेलची हालत अतिशय नाजूक होती. मात्र, त्याचा फायदा उठवू न शकलेली शिवसेनेला आताची निवडणूकही शिवधनुष्य उचलण्याइतकीच अवघड ठरणार आहे.जिल्ह्यात सहकार क्षेत्र फारसे रूजलेले नाही. सहकार म्हणून जे काही दिसते त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कब्जा आहे. स्थापनेपासून ही बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे. माजी खासदार शामराव पेजे, माजी आमदार शिवाजीराव जड्यार, गुहागरचे बापू आरेकर, माजी खासदार गोविंदराव निकम, मोहन इंदुलकर यांनी अनेक वर्षे बँक काँग्रेस (आणि नंतर काँग्रेस व राष्ट्रवादी)च्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले.२00२ साली शिवसेना-भाजपने परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली. या निवडणुकीआधी बँकेतील कर्मचाऱ्यांनी ५२ दिवसांचा विक्रमी संप केला होता. सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तीव्र होते. त्यामुळे शिवसेना-भाजप त्या निवडणुकीत आपले पाय रोवेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र २७ संचालकांमध्ये अॅड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी), हेमचंद्र माने (रत्नागिरी), दिलीप जाधव (संगमेश्वर) आणि सुधीर कालेकर (दापोली) या चौघांनाच यश मिळाले.त्यानंतरच्या म्हणजेच २00७च्या निवडणुकीत तर सत्ताधारी पॅनेल फारच अडचणीत होते. चुकीच्या व्यवहारांमुळे ६३ टक्के कर्जे एनपीएमध्ये गेली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेच्या कर्ज व्यवहारांवर टाच आणली होती. सभासद संस्थांना लाभांश मिळत नव्हता. त्यामुळे ती निवडणूक सत्ताधारी पॅनेलला जड जाणार, असे चित्र निर्माण झाले होते. अर्थात त्यावेळी युतीच्या परिवर्तन पॅनेलमधील भाजप सदस्यांना आपल्यासोबत घेण्याची शक्कल सत्ताधाऱ्यांनी लढवली. शिवसेना एकटी पडली. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचे सुधीर कालेकर (दापोली) आणि राजेश खेडेकर (रत्नागिरी) हे दोनच संचालक निवडून आले. सत्ताधारी पॅनेलमधून बंडखोरी केलेले तिघेजण निवडून आले आणि सहकार पॅनेलचे २२ संचालक विजयी झाले. या निवडणुकीतही शिवसेनेला दोनच जागांवर समाधान मानावे लागले.जिल्हा बँकेसाठी आताच्या घडीला १ हजार १८९ मतदार पात्र ठरले आहेत. जिल्ह्यात ३८0 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. या संस्थांवर पूर्वापार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. निवडणुकीचा कार्यक्रम ठरताना प्राथमिक टप्प्यात या संस्थांना बँकेकडून मतदार निश्चितीच्या ठरावासाठी नमुना पत्र पाठवले जाते. मुळात त्याच टप्प्यावर या निवडणुकीची रणनीती सुरू होते. बँकेच्या सभासद संस्थांमधून मतदानाला येणारा प्रतिनिधी आपल्या बाजूचा असावा, हेच बँकेचे मुलभूत राजकारण आहे. या वाटेवर शिवसेनेने कधी पाऊल टाकलेले नाही. शिवसेनेने यावेळी तिसऱ्यांदा शिवधनुष्य पेलायची तयारी केली आहे. पण ती तयारी उमेदवारी अर्ज भरताना सुरू झाली आहे. तोपर्यंत राष्ट्रवादीने मतदार प्रतिनिधी निवडीच्या ठरावात आपली बाजू भक्कम करून घेतली आहे.शिवसेनेनेने सहकार क्षेत्रात कधीही पुरेसे लक्ष दिले नाही. अशा निवडणुकांची तयारी वर्षभर आधीपासून न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावरच त्यात मुसंडी मारण्याचा प्रयत्न शिवसेनेने याआधी दोनदा केला आणि त्यात त्यांचेच डोके आपटले. आधीच्या दोन निवडणुकांमध्ये सत्ताधारी पॅनेलच्या नकारात्मक बाजू मोठ्या होत्या. पण गेल्या काही काळात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना बळकटी देत सत्ताधारी पॅनेलने आपली बाजू भक्कम केली आहे. त्यामुळे शिवसेनेला यावेळी जास्तीचेच प्रयत्न करावे लागणार आहेत, हे नक्की. (प्रतिनिधी)शिवसेनेत परत आलेले माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम या निवडणुकीच्यानिमित्ताने सक्रिय झाले आहेत. त्यांच्या संपर्काचा फायदा शिवसेनेला होईल, असे अपेक्षित धरले जात आहे.शिवसेनेच्या पॅनेलमध्ये मोजकेच उमेदवार अनुभवी असल्याने शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवारांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.या आधीच्या दोन निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मुद्दे असतानाही शिवसेनेला मोठे यश मिळाले नव्हते. त्यामुळे आता शिवसेना काय करिश्मा करणार, ही बाब लक्षणीय ठरणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक शिवसेनेसाठी शिवधनुष्यच...!
By admin | Published: April 08, 2015 9:51 PM