खारेपाटण (सिंधुदुर्ग) : शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश दत्ताराम गुरव यांची कणकवली, देवगड व वैभववाडी या विधानसभा मतदार संघाच्या प्रवक्तेपदी शिवसेना पक्षाच्यावतीने निवड करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने कणकवली विधानसभा मतदार संघाच्या प्रवक्तेपदी निवड झाल्याचे लेखी पत्र शिवसेना पक्षाच्यावतीने २९ फेब्रुवारी रोजी जिल्हा अध्यक्ष संजय आग्रे यांनी खारेपाटण येथील कार्यकर्ते मंगेश गुरव यांना दिले आहे. ही नियुक्ती १ वर्षासाठी असल्याचे देखील लेखी पत्रात नमूद करण्यात आले आहे.मंगेश गुरव यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर गेल्या वर्षभरात पक्षासाठी प्रामाणिक काम केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची खारेपाटण ही पहिली ग्रामपंचायत निवडून आणण्यामध्ये मंगेश गुरव यांचे मोठे योगदान आहे. तसेच विभागात पक्षाच्यावतीने छोटे-मोठे सामाजिक कार्यक्रम राबवून पक्ष संघटना मजबूत ठेवण्याचे कार्य करत आहे. एकंदरीत पक्षाने त्यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन त्यांची ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली विधानसभा मतदार संघाच्या प्रवक्तेपदी निवड केली आहे.पक्षवाढीसाठी प्रामाणिक कामशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार व प्रसार करण्यासाठी वापर करणार आहोत. सर्वांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना पक्षाचे नवनिर्वाचित कणकवली विधानसभा प्रवक्ते मंगेश गुरव यांनी सांगितले.
कणकवली विधानसभा शिवसेनेच्या प्रवक्तेपदी मंगेश गुरव यांची निवड
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 02, 2024 12:35 PM