बांदा : जीर्ण वीजतारा अंगावर पडून दोघा युवकांचा बळी गेल्याची सावंतवाडी येथील घटना ताजी असल्याने बांदा शहरातील जीर्ण वीजतारादेखील बदलण्याचे काम यद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. बांदा शहरातील वीजतारा ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या असून, येथेही तारा तुटण्याच्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत.बांदा शहरातील सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या वीजतारा बदलण्यात येणार आहेत. यासाठी वीज वितरण कंपनीने भारत विकास ग्रुप या कंपनीला वीजतारा बदलण्याचे कंत्राट दिले आहे. या कंपनीचे २६ कामगार हे काम युद्धपातळीवर करीत आहेत.सुदैवानी जीवितहानीटळली होतीशहरातील गांधीचौक, आळवाडी, कट्टा कॉर्नर बाजारपेठेत वीजतारांचे जाळे मोठ्या प्रमाणात असून, या तारा जीर्ण झाल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी बांदा-देऊळवाडी येथे वीजतारा तुटून पडण्याची घटना घडली होती. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. सावंतवाडी येथे वीजतारा तुटून पडण्याची घटना घडल्यानंतर बांदा शहरातील विद्युततारा बदलण्याची मागणी स्थानिकांतून होत होती. यानुसार शहरातील तीन किलोमीटर लांबीच्या वीजतारा बदलण्यात येणार आहेत. यादरम्यान शहरातील वीज पुुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीने केले आहे. वीजतारा बदलण्यात येत असल्याने स्थानिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
विद्युततारा बदलण्याचे काम युद्धपातळीवर
By admin | Published: December 17, 2014 9:16 PM