सावंतवाडी : सावंतवाडीसह परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच तालुक्यातील कारिवडे-डंकवाडी येथे एका घरावर विजेचा लोळ कोसळला. त्यामुळे घरातच मोठा खड्डा तयार झाला असून घरात असलेल्या आई- वडिलांसह मुलगी जखमी झाली आहे. मात्र, या घटनेत अन्य एक जण थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.सावंतवाडीत सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट होऊ लागला. तसेच काही वेळानंतर विजांचा लखलखाटही सुरू झाला. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. मात्र काही काळानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तास पाऊस कोसळत होता. या पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत बनले होते. बाजारात आंबा विक्रीसाठी बसलेल्यांना याचा चांगलाच त्रास झाला. सर्व आंबे भिजून गेले.
विजेची तीव्रता एवढी भीषण होती की, विजेच्या लोळाबरोबरच आतील विद्युत मीटर घरातून बाहेर फेकला गेला. तर घराच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला. तसेच घरात असलेल्या अंकुश यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी यांना याचा जबर दणका बसला. विजेच्या लोळामुळे तिघेही जखमी झाले. त्यांना कुटीर रूग्णालयात दाखल केले.ही घटना घडली तेव्हा अंकुश यांचा मुलगा अंगणात होता. त्यामुळे तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेनंतर कारिवडे परिसरात एकच खळबळ उडाली होती. कारिवडे ग्रामस्थांनी डंकवाडी येथील रेडकर यांच्या घरी धाव घेत झाला प्रकार पाहिला व रेडकर कुटुंबास मदत केली. सोमवारी पडलेल्या पावसावेळी मोठ्या प्रमाणात विजा कडकडत होत्या. तसेच ढगांचा गडगडाट सुरू होता. त्यामुळे सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते.रेडकर कुटुंबीयांचे मोठे नुकसानविजेचा लोळ घरावर पडताच विद्युत मीटर जळून तो घराबाहेर पडला. याचबरोबर घरातील विद्युत फिटींग जळून खाक झाली. काही विद्युत उपकरणेही निकामी झाली. त्यामुळे रेडकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या दुर्घटनेत तिघे जखमी झाले आहेत.