-सचिन खुटवळकरदोडामार्ग - काजूच्या बागेत घुसलेल्या हत्तीला हुसकवण्यासाठी गेलेल्या युवकांवर टस्कर (सुळे असलेला) हत्तीने हल्ला करण्याची घटना मोर्ले येथे शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. युवकांनी अंधारातून धूम ठोकून जीव वाचवला. त्यानंतर सुमारे तासाभराने हत्ती नंदकिशोर येर्लेकर यांच्या घराजवळ दिसून आल्याने लोकांनी जीवाच्या भीतीने रात्र जागून काढली. हत्तीप्रश्नी वन खात्याचे दुर्लक्ष होत असून लोकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण टोकाकडील मोर्ले गावात टस्कर हत्तीने दहशत निर्माण केली आहे. तुषार देसाई यांच्या काजूच्या बागेत हत्ती आल्याचा सुगावा लागल्यावर काही युवक हत्तीला पिटाळून लावण्यासाठी गेले. बॅटरीच्या उजेडात अकस्मात हत्ती समोर बघून युवक गडबडले. त्याच वेळी जोरात ओरडत हत्ती युवकांवर धावून आला. गांगरलेल्या युवकांनी प्रसंगावधान राखून जीवाच्या आकांताने तेथून पळ काढला. या गडबडीत एकाची बॅटरी तिथेच पडली.
...तर कायदा हातात घ्यावा लागेल! मोर्ले गावचे सरपंच महादेव गवस व उपसरपंच पंकज गवस यांनी 'लोकमत'ला सांगितले की, तिलारी परिसरात गेले अनेक महिने हत्ती ठाण मांडून आहेत. अनेक गावांमध्ये शेती-बागायतीचे नुकसान त्यांनी केले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वन खाते व सरकार गंभीर नाही. आता हत्ती गावात आले असून लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यापुढे शेती-बागायती करण्यासाठीही कोणी धजावणार नाही. त्यामुळे वन खाते हत्तींचा बंदोबस्त करत नसेल, तर नाइलाजाने लोकांना आत्मसंरक्षणासाठी कायदा हातात घ्यावा लागेल. आणि याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल!
वनमंत्री महोदय, एखादा बळी जाण्याची वाट बघत आहात का?दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव गेले कित्येक महिने सुरू आहे. याची माहिती वनमंत्र्यांना नाही का, वनमंत्री आहेत तरी कुठे, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. एखाद्या नागरिकाचा हत्तींकडून बळी जाण्याची वाट ते बघत आहेत का? अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत.