माणगाव : हत्तींनी साळगाव, नानेलीनंतर आपला मोर्चा माणगाव येथील बेनवाडी, कुंभारवाडी, सुतारवाडी येथे वळविला असून, शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास माड, केळी आणि भाताच्या उडवीचे नुकसान केले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. माणगाव खोऱ्यात हत्तींनी नुकसानसत्र सुरूच ठेवले असून दररोजच्या नुकसानीचे पंचनामे वन विभागाकडून केले जात आहेत. गुरुवारी संध्याकाळी साळगाव येथून नानेली येथे परत आलेले दोन हत्ती शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बेनवाडीत दाखल झाले. वाटेत कुंभारवाडी येथील पांडुरंग कुंभार यांचे पाच माड, रेमुळकर यांचे तीन माड पाडले. मात्र, त्यातील एक माड खांबावर पडल्याने या भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. बेनवाडी येथील पांडुरंग बागवे यांच्या वायंगणी भातशेतीचे नुकसान केले. त्यानंतर हत्तींनी आपला मोर्चा बाबू शिवापूरकर-मेस्त्री यांच्या माडांकडे वळविला. त्यांचे काही माड जमीनदोस्त करून व केळींचे नुकसान करून सुतारवाडी येथील अनिल मेस्त्री यांची भाताची उडवी पूर्णत: तुडवून नुकसान केले. तर बबन मेस्त्री यांच्या एका माडाचे नुकसान केले. (प्रतिनिधी)
हत्ती बेनवाडी, कुंभारवाडीकड
By admin | Published: December 19, 2014 9:28 PM