वैभव साळकरदोडामार्ग : उच्च अधिकार समिती हत्ती प्रकल्पाचे सदस्य आणि हत्ती पशुवैद्य डॉ. एस. एन. मनोहरन यांनी तालुक्यातील हत्तीबाधित गावांना भेट देत पाहणी केली. तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता हत्तींना रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, याबाबत उपस्थित वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. एस. एन मनोहरन हे हत्ती जीवशास्त्रज्ञ असून देशभरातील विविध हत्ती बचाव मोहिमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांच्या सूचनेप्रमाणे डॉ. एस. एन मनोहरन यांनी तालुक्यातील हत्तीबाधित क्षेत्रांची पाहणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड वनविभाग हद्दीतून दोडामार्ग वनपरिक्षेत्र हद्दीत आलेल्या गेल कंपनीच्या पाइपलाइनच्या मार्गाने हत्ती बांबर्डे गावात प्रवेश करतात. तेथून पुढे घाटीवडे, हेवाळे, तेरवण मेढे, सोनावल, पाळ्ये, घोटगेवाडी, मोर्ले, केर या भागात कशा प्रकारे मार्गक्रमण करून स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे, फळबागायंतीचे नुकसान करतात. याबाबत क्षेत्रीय फिरती करून माहिती घेतली.तसेच नकाशाद्वारे माहिती घेऊन दोडामार्ग वनपरिक्षेत्राचे क्षेत्रीय अधिकारी तथा कर्मचारी व फिरते पथक सावंतवाडीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी हत्तीची वर्तणुकीचा अंदाज घेऊन कशा पद्धतीने परिस्थिती हाताळणे, परिस्थिती हाताळतेवेळी कोणती काळजी घ्यावी? या बाबतच्या सूचना सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.
हत्ती प्रतिबंधक यात हत्ती प्रतिबंधित चर, सोलर हँगिंग फेन्सिंग आदी कामांची पाहणी केली. तसेच जागेवरील परिस्थितीप्रमाणे हत्ती प्रतिबंधित चर, सोलर हँगिंग फेन्सिंग व अन्य हत्ती प्रतिबंधक कामे आवश्यकतेप्रमाणे करण्याबाबत सूचना यावेळी दिल्या. हत्ती अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी व त्यांच्या हालचाली लक्षात घेण्यासाठी वॉच टॉवर करण्याबाबतही सूचना दिल्या.उपाययोजनांबाबत सूचना
याखेरीज घोटगेवाडी येथील एलिफंट कॅम्प ठिकाणी भेट दिली. शिवाय उपस्थित सर्व अधिकारी व वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांच्याशी चर्चा करून करावयाच्या कामाबाबत व उपाययोजनांबाबत सूचना व मार्गदर्शन केले. यावेळी उपवनसंरक्षक (प्रादे.) वनविभाग सावंतवाडी, दोडामार्ग वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, क्षेत्रीय कर्मचारी वर्ग, फिरते पथक सावंतवाडीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.