दोडामार्ग : आपली दुचाकी घेऊन भेकुर्लीला जाताना पुढ्यात अचानक हत्ती दाखल झाल्याने दुचाकी तिथेच टाकून जीव वाचविण्यासाठी पळ काढण्याची वेळ केर येथील स्वप्नील देसाई या युवकावर आली. ही घटना रविवारी दुपारी घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. या प्रकारामुळे केर ग्रामस्थांनी वन विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.गेल्या महिन्याभरापासून केर, मोर्ले परिसरात हत्तींचा कळप वास्तव्यास आहे. कधी मोर्ले, तर कधी केर असा हत्तींचा प्रवास सुरू आहे. त्यापैकी टस्कर हत्ती सध्या केरमध्ये आहे. तर बाजूच्या परिसरात इतर दोन हत्ती आहेत. गेल्या महिन्याभरापासून या भागात हत्तींकडून नुकसानसत्र सुरू आहे. एसटी बस अडविणे, बागायतींचे नुकसान करणे, लोकवस्तीत शिरकाव करणे असे अनेक प्रकार हत्तींकडून झाले आहेत.असाच एक प्रकार रविवारी घडला. केरमधील स्वप्नील देसाई हा युवक आपली दुचाकी घेऊन भेकुर्लीला जाण्यासाठी निघाला होता. पण रस्त्यात मध्येच टस्कर हत्ती आल्याने त्याची भीतीने गाळण उडाली. आपली दुचाकी तेथेच टाकून त्याने तेथून जीव वाचविण्यासाठी पळ काढला.या घटनेबाबत गावकऱ्यांना समजताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महिन्याभरापासून हत्तींचा उपद्रव सुरू आहे. मात्र, वन विभाग बंदोबस्त करीत नसल्याने सोमवारी दोडामार्ग येथील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, दाजीबा देसाई यांच्या बागायतीचेही हत्तींनी नुकसान केल्याचे वृत्त आहे.
हत्ती भेकुर्लीत दाखल, दैव बलवत्तर म्हणून युवक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 2:24 PM
आपली दुचाकी घेऊन भेकुर्लीला जाताना पुढ्यात अचानक हत्ती दाखल झाल्याने दुचाकी तिथेच टाकून जीव वाचविण्यासाठी पळ काढण्याची वेळ केर येथील स्वप्नील देसाई या युवकावर आली. ही घटना रविवारी दुपारी घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. या प्रकारामुळे केर ग्रामस्थांनी वन विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ठळक मुद्दे हत्ती भेकुर्लीत दाखल, दैव बलवत्तर म्हणून युवक बचावलाकेर ग्रामस्थांनी व्यक्त केला वन विभागावर संताप