दोडामार्ग : दोन पिल्लांसह दोन हत्तीणींनी पुन्हा एकदा तिलारी खोऱ्यात आपली हजेरी लावली. अन्नाच्या शोधात ते गावोगावी भटकंती करीत असल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. केर गावातून हे हत्ती सोमवारी थेट मोर्ले गावात दाखल झाले. ते दिवसाही भटकत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यावर हत्तींचे संकट पुन्हा गडद झाले आहे.
महिनाभरापूर्वी दोन पिल्ले आणि नर-मादी असा चार हत्तींचा कळप वीजघर परिसरात दृष्टीस पडला होता. मात्र, त्यानंतर काही दिवस त्यांची तिलारी खोऱ्यात जागा नव्हती. परंतु, दोन दिवसांपूर्वी हा कळप पुनश्च तिलारीच्या खोऱ्यात दाखल झाला. केर गावात एका तळीत हा कळप डुंबताना दृष्टीस पडला. गेले दोन दिवस केर गावच्या परिसरात त्यांचा वावर होता. मात्र, सोमवारी रात्री हत्तींच्या या कळपाने आपला मोर्चा मोर्ले गावाच्या दिशेने वळविला आहे.सोमवारी रात्री हत्ती केर गावातून मोर्ले गावात उतरले आणि ज्या ठिकाणी वनविभागाने मधमाशांच्या पेट्या बसविल्या होत्या त्यांच्या मधूनच हत्तींनी मोर्ले गावात शिरकाव केला आणि वनविभागाचे हे विधान खोडून काढले. गेली कित्येक वर्षे वनविभाग हत्तींना रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे. मात्र, त्या सर्व उपाययोजना निरुपयोगी ठरत आहेत.
मधुमक्षिका पेट्यांचा कोणताही परिणाम नाही
हत्ती कितीही वर्षांनी परतले तरीही ते पूर्वीच्या मार्गानेच भ्रमंती करीत असतात. त्यामुळे मोर्ले गावात वनविभागाने हत्ती येतात, त्याच मार्गावर मधुमक्षिका पेट्या बसविल्या आहेत. मधमाशीला हत्ती घाबरतात, असे वन विभागाचे म्हणणे आहे. म्हणून त्यांनी मोर्ले गावात हत्तींच्या मार्गावर मधमाशांच्या पेट्या बसविल्या. परंतु त्याचा काहीही परिणाम हत्ती येण्यावर झाला नाही.
शेतकरी धास्तावला
यापूर्वी या परिसरात मोठ्या हत्तींचा वावर होत असे. मात्र, यावेळी त्यांच्या सोबत त्यांची पिल्ले आहेत. आणि हा कळप अन्नाच्या शोधासाठी दिवसाढवळ्या भटकंती करीत आहे. जास्तकरून शेतीच्या परिसरात त्यांची वर्दळ असते. त्यांना हाकलण्यासाठी उपाययोजना केली तर त्यांच्या सोबत पिल्ले असल्याने ते माणसावर आक्रमण करणार या भीतीने आता शेतकरी धास्तावला आहे. त्यांच्यापासून शेतीचा बचाव करणे शेतकऱ्याला कठीण झाले आहे.