तळेरे : यावर्षीची इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऐन गणेश चतुर्थीच्या कालावधीत आली होती. मात्र, आता शिक्षण उपसंचालकांनी ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे.अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत शाळा, संस्था, शिक्षक, विद्यार्थी व पालकांतून नाराजीचा सूर निघत होता. शिक्षक भारती सिंधुदुर्ग व शिक्षक भारती रत्नागिरी यांनी या तारखांवर आक्षेप घेत दोन जिल्ह्यांतील गणेशोत्सव काळामधील तारखा बदलण्याची लेखी विनंती शिक्षण उपसंचालक कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी व रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती.दोन्ही जिल्ह्यातील संघटनांनी जाहीर वेळापत्रकाचा पाठपुरावा करून या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्या होत्या. सकारात्मक दखल घेऊन शिक्षण उपसंचालकांनी पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करीत वेळापत्रकातील गणेशोत्सव काळ वगळून नवीन वेळापत्रक १२ रोजी फक्त सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पुन्हा नव्याने जाहीर केले आहे.
या दोन जिल्ह्यांत १८ सप्टेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. शिक्षक भारती सिंधुदुर्ग व रत्नागिरी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने शिक्षक, विद्यार्थी, पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.