देवरुख : ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत घोटाळा झाला असल्याची कबुली आज शुक्रवारी संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत दिली. हा घोटाळा नेमका किती कोटींचा आहे याची उकल लेखा परीक्षणानंतर होईल. या साऱ्या प्रकरणात व्यवस्थापिका वासंती निकम यांचाच हात असल्याचे सकृ तदर्शनी दिसून येत असल्याची स्पष्ट माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम जोशी यांनी दिली.देवरुखमधील एका प्रसिद्ध व सातत्याने आॅडिट ‘अ’ वर्गात असणाऱ्या एका पतसंस्थेत ‘कोटींची’ अफरातफर झाल्याच्या चर्चांना एकच ऊत आला होता. त्या चर्चांना आता शुक्रवारी संचालक मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूर्णविराम मिळाला आहे. ही पत्रकार परिषद पतसंस्थेच्या कार्यालयात दुपारी १२.३० वाजता घेण्यात आली. या घोटाळ्यामध्ये संचालक मंडळाचा कोणत्याच प्रकारचा सहभाग नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला.पतसंस्थेतील झालेल्या कर्ज व्यवहारावर संचालक मंडळाने नजर टाकली असता ठेवीवरच अधिक कर्ज घेतल्याचे दिसून आले आणि यावेळी याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला असता ठेवींचे खोटे अकाऊंट दाखवून हा बनाव व्यवस्थापिकेने केला असल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे आली. कोटींच्या घरामध्ये हा आकडा असल्याच्या प्राथमिक अंदाजावरून संचालक मंडळाची एकच धावपळ झाली. संचालकांनी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या प्रकरणाबाबतची आपली भूमिका जाहीर केली आहे.
व्यवस्थापिकेची कबुलीकाही संचालक आणि संचालक मंडळाचे वकील यांच्यासमोर व्यवस्थापिका वासंती निकम यांनी या घोटाळ्याची तोंडी कबुली दिली असल्याचेही शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत संचालकांकडून सांगण्यात आले. यावेळी बोलताना जोशी म्हणाले की, या घोटाळ्यामध्ये अन्य कोणाचा हात आहे किंवा या प्रकरणाविषयी काही सांगण्यासाठी कोणाचा दबाव येत आहे का? याबाबतही निकम यांच्याशी बोलणे झाले आहे.रक्कम परत करूझालेल्या अफरातफरीची तोंडी कबुली देत आपण घोटाळ्यातून घेतलेली रक्कम परत करू, असे तोंडी आश्वासन वासंती निकम यांनी दिले आहे. त्यांनी १५ दिवसांची मुदतही मागितली आहे, असेही संचालकांनी सांगितले.घोटाळ्याचा आकडा लवकरचपतसंस्थेत झालेला घोटाळा नेमका किती रकमेचा आहे, हे लेखा परीक्षणानंतरच समजेल. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याशी चर्चा करून सहकार बोर्डाच्या पॅनेलवरील लेखा परीक्षकांकडून हे परीक्षण केले जात आहे. तोपर्यंत खात्रीपूर्वक किती रुपयांचा कोटींचा घोटाळा झाला आहे, हे सांगता येणार नाही, असे संस्थाध्यक्ष राजाराम जोशी यांनी सांगितले.