कणकवली : कोरोनाच्या काळात जिल्हा रुग्णालयाकडून रुग्णांसाठी खरेदी केलेल्या विविध साहित्यात लाखो रुपयांचा अपहार झाला आहे. यात तीन हजार रुपयांना मिळणारी थर्मल गन दहा हजार रुपये तर दोन हजाराला मिळणारा पल्स आॅक्सीमीटर पाच हजार रुपयाने खरेदी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेऊन उघड करणार आहे, असा इशारा मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाकडे सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते देण्यासाठी पैसा नसताना कोविडसाठी प्राप्त झालेल्या निधीची उधळपट्टी करून अनावश्यक व निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदी करण्याचे काम जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांचे भांडारपाल यांच्यामार्फत सुरू आहे.
मार्च २०२० पासून कोविडपासून आलेल्या निधीतून खासगी पुरवठादाराकडून साहित्य खरेदी करीत असताना चढ्या दराची दरपत्रके एकाच पुरवठादाराकडून प्राप्त करून घेऊन अनावश्यक खरेदी करून मोठ्या प्रमाणात भष्टाचार करण्याचे कार्य वरिष्ठ अधिकारी करीत आहेत.सावंतवाडी व कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया होत असतील तर त्यांच्या आॅपरेशन थिएटरसाठी लागणऱ्यांया आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अपुऱ्या पडत असल्याने कोविड रुग्णाव्यतिरिक्त असलेल्या रुग्णांवर उपचार देणे डॉक्टरांना कठीण होत आहे, असेही उपरकर यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.सर्व प्रकारची माहिती प्राप्त करून घेणारयेथील कामाचा भार कमी करण्यासाठी रुग्णांना जिल्हा रुग्णालय येथे पाठविले जावे. परंतु, तसे होताना दिसत नाही. म्हणूनच सर्व प्रकारची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्या संबंधीची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे व शासनाच्या सचिवांकडे करणार असल्याचे उपरकर यांनी म्हटले आहे .