मालवण : मालवण शहरात सध्या अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. यामध्ये प्रामुख्याने १५ ते २५ वयोगटातील युवक गुंतलेले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मालवणातील हे युवक अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन झाले असून मागणी नुसार अंमली पदार्थांची पाकिटे ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा छुपा गैर धंदाही वाढीस लागला असून यामध्येही मालवणातील बरेच युवक सहभागी असल्याची चर्चा आहे.मालवणसह वायरी तारकर्ली देवबाग या किनारी भागात पर्यटन बहरत आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांबरोबर मोठ्या प्रमाणात पैसाही येत आहे. पर्यटन व्यवसायात मोठ्या प्रमाणावर युवक व तरुण वर्ग गुंतलेला असल्याने हा पैसा त्यांच्या हातात खेळत आहे.
हातात येणाऱ्या पैशाचे कोणतेही नियोजन नसल्याने ही युवा मंडळी पैशाचा वापर मौज मजा करण्यात उडवत आहे. यातूनच मद्यपान, धूम्रपान, गांजा, कोकेन व ड्रग्ज आदी अंमली पदार्थांच्या युवक आहारी गेले आहेत. त्याबरोबरच अवैध जुगार अड्डेही वाढले आहेत. अनेक ठिकाणी खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन करत आहेत, असे बोलले जात आहे.युवकांची अंमली पदार्थांची गरज भागविणारे मोठे रॅकेट सध्या मालवण शहरासह वायरी, तारकर्ली देवबाग याभागात सक्रिय असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यातील ड्रग्ज माफियांनी १५ ते २५ या वयोगटातील युवकांना आपले लक्ष्य बनवून त्यांना अंमली पदार्थ पुरवितानाच अंमली पदार्थांच्या विरतरणासाठी या युवकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे असे बोलले जात आहे.
गरजूंना अंमली पदार्थांची पाकिटे या युवकांमार्फत पोच केली जात आहेत. तसेच मालवण, वायरी तारकर्ली, देवबाग याभागात येणाऱ्या पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांनाही अंमली पदार्थ पोच करण्याचे काम हे युवक करत असल्याची चर्चा आहे. या अवैध धंद्यामुळे युवक ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. पोलीस याचा माग काढून ठोस कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.