कणकवली : कणकवली शहरातील आॅटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी २१ दिवसांच्या गणरायांना ढोलताशांच्या गजरात जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे ५२७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ५ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला होता. प्रत्येकाच्या रुढी, परंपरेप्रमाणे दीड, पाच, सात अकरा, सतरा, एकोणीस अशा विविध दिवशी गणरायांना निरोप देण्यात आला. तर काही ठिकाणी गौरी, गणपतींचे विसर्जन एकत्रित करण्यात आले. काही घरगुती तर काही सार्वजनिक मंडळांच्या गणरायांना रविवारी २१ दिवसांनी निरोप देण्यात आला. यामध्ये कणकवलीतील आॅटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सार्वजनिक गणपतीचा समावेश होता. ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने या गणरायाला जानवली नदीवरील गणपती सान्यावर रात्री उशिरा निरोप देण्यात आला. या विसर्जन मिरवणुकीत तालुक्यातील रिक्षा चालक बहुसंख्येने सहभागी झाले होते. मुणगे येथे बाप्पाचा जयघोष कुणकेश्वर : फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोलताशांच्या गजरात व ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री देवी भगवती देवस्थानच्या बाप्पाला मोठ्या भक्तीभावात निरोप देण्यात आला. दुपारी धार्मिक विधी पार पडल्यानंतर झेंडूच्या फुलांची आकर्षक आरास मांडलेल्या गाडीत बाप्पाला विराजमान करण्यात आले. सतत चार-पाच दिवस पडणाऱ्या पावसाने उसंत घेतल्याने गणेशभक्तांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. मिरवणुकीमध्ये तरुण मंडळींबरोबरच प्रौढही ढोलताशांचा ठेका धरताना दिसत होते. महिलावर्गाचाही विशेष सहभाग दिसून येत होता. विसर्जनाच्या मार्गातील प्रत्येक वाडीमध्ये ‘श्रीं’च्या मिरवणुकीचे स्वागत जल्लोषात केले जात होते. गणेशभक्तांसाठी सरबत व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तब्बल पाच तास चाललेल्या मिरवणुकीनंतर मुणगे आडवळवाडी समुद्रकिनारी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. २१ दिवसांचा गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याने देवस्थान ट्रस्टने आभार व्यक्त केले. जिल्ह्यात सर्वत्र अशाचप्रकारचे वातावरण विसर्जनाच्यावेळी दिसून येत होते. (प्रतिनिधी)
गणरायाला भावपूर्ण निरोप
By admin | Published: September 25, 2016 11:26 PM