मालवण : प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारून सर्वांगीण विकास करायचा आहे. इंग्रजी शाळांच्या तोडीस तोड प्राथमिक शाळांतील मुले घडवण्यावर आपला भर राहील, असे प्रतिपादन सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले.मालवण पंचायत समितीच्या संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत ठरलेल्या विद्यालय ॲप या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तिसरी ते आठवीपर्यंत मूल्यमापन परीक्षा गुरुवारी सकाळी संपूर्ण तालुक्यात कोरोनाचे नियम पाळून पार पडली. या परीक्षेचे उद्घाटन ओम साई मंगल कार्यालय कट्टा येथे मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती सतीश परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, गटशिक्षण अधिकारी माने, पंचायत समिती सदस्य मनीषा वराडकर, कमलाकर गावडे, केंद्रप्रमुख कांबळी, विस्तार अधिकारी उदय दीक्षित, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लोहार, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी माने यांनी केले.गटविकास अधिकारी जाधव म्हणाले, विद्यालय ॲप हा अभिनव उपक्रम आहे. शाळा बंद असूनही तालुक्यात उकृष्ट शिक्षण या ॲपमुळे मिळाले तसेच परीक्षा झाल्यामुळे मुलांची प्रगती समजण्यासही हातभार लागला. उपसभापती सतीश परुळेकर यांनी मुलांची प्रगती व्हावी हाच मुख्य दृष्टीकोन आपला आहे असे सांगितले. सूत्रसंचालन सुयोग धामपूरकर यांनी केले. केंद्रप्रमुख कांबळी यांनी आभार मानले. या सर्व उपक्रमाची पालक, शिक्षक यांनी प्रशंसा केली.