रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मिश्रक म्हणून काम करताना तब्बल ८ वर्षे ३ महिने २३ दिवस गैरहजर राहिलेल्या कोंडउंबरे (ता. संगमेश्वर) प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी निजामुद्दिन एम. पीरजादे याला सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. तसेच सतत गैरहजर राहणारा शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक बाबली बापू चेंदवणकर याला सेवेतून का कमी करू नये, अशी नोटीस बजावल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. जिल्हा परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा व कामचुकार कर्मचाऱ्यांवर वचक राहावा, यासाठी काळम यांनी मुुख्य कार्यकारी अधिकारीपदावर आल्यापासूनच कणखर भूमिका घेतली आहे. त्यांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेत कामचुकारपणा करणाऱ्या २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बाबली बापू चेंदवणकर हा कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होता. मात्र, सतत गैरहजर राहात असल्याने त्याला मूळ वेतनावर आणून शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यात काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे सेवेतून निलंबित का करू नये, अशी नोटीस या कर्मचाऱ्याला बजावण्यात आली आहे. या नोटीसीला त्या कर्मचाऱ्याने दहा दिवसांत उत्तर द्यावे, असेही बजावले आहे. दुसऱ्या प्रकरणात गैरहजर राहण्याचा कळसच झाला आहे. निजामुद्दीन पीरजादे हा १९८५ सालापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मिश्रक म्हणून सेवेत होता. त्याला संगमेश्वर तालुक्यातील कोंडउंबरे प्राथमिक आरोग्यकेंद्रात नियुक्त करण्यात आले होते. मात्र, तो ७ जुलै २००४ पासून अनधिकृतरित्या गैरहजर राहिला. त्यामुळे तब्बल ८ वर्षे ३ महिने व २३ दिवस अशी त्याची गैरहजेरी लागली आहे. यादरम्यान त्याने आपण मनोरुग्ण असल्याचा दाखला जिल्हा परिषदेत सादर केला होता. नियमानुसार असा दाखला आल्यानंतर त्याबाबत तपासणीसाठी त्याला सांगली येथील केंद्रात पाठवण्यात आले होते. त्या केंद्रातून तपासणीचा अंतिम अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या अहवालात संबंधित कर्मचाऱ्याने मनोरुग्ण असल्याचा खोटा दाखला सादर केला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा कर्मचारी खोटे बोलत असल्याचे पुढे आले. या कर्मचाऱ्याला सक्तीची सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काळम यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षांच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २८ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अस्त्र उगारल्याने कामचुकारपणा करणाऱ्यांना जोरदार धक्का बसल्याची चर्चा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. (प्रतिनिधी)
कर्मचारी सव्वाआठ वर्षे गैरहजर...
By admin | Published: March 31, 2015 9:44 PM