बोरवडे : कागल तालुक्यातील डोंगररांगामध्ये वसलेल्या सोनाळी गावामध्ये शासनाची रोजगार हमी योजना गावकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. शेतमजूर भूमिहीन कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत घेत आहेत. यातून गावातील पूर्वीपासून झाडाझुडपांच्या गर्दीत गडप झालेले पाणंद रस्ते प्रशस्त झाले आहेत. गावचा चेहरामोहराच यामुळे बदलला आहे.‘हाक शासनाची, हमी रोजगाराची’ या शासनाच्या घोषवाक्याचा हेतू सोनाळीमध्ये सफल होताना दिसत आहे. बेरोजगार नागरिकांना रोजगार मिळावा व त्यातूनच गावचा विकास व्हावा, या उद्देशाने सोनाळीत ‘रोहयो’ची कामे सुरू आहेत.सोनाळी गावामध्ये रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवीत गेल्या तीन वर्षांपासून पाणंद रस्त्यांची कामे मजुरांकडूनच पारदर्शकपणे सुरू आहेत. रोजगार हमीकडे काम करणाऱ्या लोकांना प्रतिदिन १४५ ते १६२ रुपये हजेरी मिळते. त्यामुळे काम मिळण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. पाणंद रस्त्यांनी २० ते २५ फुटांचे प्रशस्त रूप धारण केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी सोनाळी गावाला भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.रोजगार हमी योजनेत काम केलेल्या मजुरांचे पैसे देण्यास प्रशासनातील उदासीनतेमुळे विलंब झाल्यास स्वत:कडील पैसे मजुरांना देऊन सहकार्य करतो. भूमिहीन कुटुंबांना आपल्या गावातच रोजगार मिळाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. शिवाय गावच्या विकासालाही चालना मिळाली आहे.- सत्यजित पाटील, सरपंच
रोजगार हमीतून पाणंदी झाल्या प्रशस्त
By admin | Published: February 04, 2015 10:04 PM