गुहागर : राज्याचे विहीत मासेमारी क्षेत्र असलेल्या १२ सागरी मैलांच्या आतील समुद्री क्षेत्रात परराज्यातील २०० ते ४०० अश्वशक्तीच्या मोठ्या मासेमारी नौका सामूहिकरित्या घुसखोरी करीत आहेत. परराज्यातील नौकांचे आक्रमण थांबवण्यासाठी मत्स्य विभागाने वेळीच उपाययोजना करावी अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा गुहागर तालुका मच्छिमार संघटनेने मत्स्य व्यवसाय आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.परराज्यातील मोठ्या मासेमारी नौका शासनाने किनाऱ्यापासून १२ सागरी मैलाची नेमून दिलेली मर्यादा भंग करत स्थानिक हद्दीत घुसखोरी करुन मासेमारी करतात. शासनाची संबंधित यंत्रणादेखील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरली आहे. पुरेसा मत्स्यसाठा निर्माण व्हावा, यासाठी १२ सागरी मैलाची मर्यादा वाढवून मोठ्या नौकांना २४ सागरी मैलांच्या बाहेर मासेमारी करण्याचे बंधन घालावे, असे या निवेदनात म्हटले आहे.पर्ससीननेटद्वारे केल्या जाणाऱ्या किनारपट्टीलगतच्या मासेमारीमुळे लहान आकाराची मासळी मोठ्या प्रमाणात मारली जाते. मत्स्य बिजाचेही यामुळे नुकसान होते. अनावश्यक मासे पुन्हा समुद्रात फेकले जातात. अशा प्रकारे बेसुमार मासेमारीवर निर्बंध लावण्यात यावेत. फेब्रुवारी २०१४ पासूनचा डिझेल परतावा शासनाकडून अद्याप मिळालेला नाही. वास्तविक पाहता मच्छिमार संस्थांमार्फ त डिझेल पुरवठा करताना व्हॅटची रक्कम भरुनच डिझेल खरेदी केले जाते. ही परतावा रक्कम दर महिन्याला मिळाल्यास मच्छिमारांचे मासिक व्यावसायिक खर्च भागवले जातील. मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी स्थानिक कष्टकरी मच्छिमारांच्या या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर विठ्ठल भालेकर, सखाराम पाटील, नंदकुमार रोहिलकर, जयंत लाकडे, दत्ताराम पाटील, निवृत्ती गुढेकर, रमेश खारवटकर, कृष्णा तांडेल, पांडुरंग पावसकर, गजानन हेदवकर, सचिन सैतवडेकर आदी ११ मच्छिमारी संस्थांच्या प्रतिनिधींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)मच्छिमारी संस्थांनी एकत्र येऊन दिले निवेदन.२४ सागरी मैलाच्या बाहेर मासेमारीसाठी बंधन घालण्याची केली मागणी.
परराज्यातील नौकांचे अतिक्रमण
By admin | Published: May 20, 2015 11:38 PM