गुहागर : गुहागर खालचा पाट समुद्रकिनारी असगोली येथील ज्ञानेश्वर अडूरकर यांची मच्छीमारी नौका भरकटून किनाऱ्यालगत लागली. वाळू व पाण्याच्या दणक्यामुळे मधला भाग तुटून मोठे नुकसान झाले आहे.गुहागर शहरालगत असणाऱ्या असगोली गावात मोठ्या प्रमाणात मच्छीमार समाजाची वस्ती आहे. असगोली येथील ज्ञानेश्वर अडूरकर हे आपल्या मालकीची सरस्वती नामक मच्छीमारी नौका गुरुदास अडूरकर, संकेश जाकले, विलास पालशेतकर यांना घेऊन नेहमीप्रमाणे पहाटे ४ वाजता मच्छीमारीसाठी निघाले होते. काळोख व धुक्यामुळे नौकेच्या चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही. असगोलीपासून २ किलोमीटरवर खालचा पाट येथील नारायण मंदिरनजीक समुद्र किनाऱ्यालगत ही नौका लागली. नौका पूर्णत: बुडाली नसल्याने नौकेवरील कोणालाही दुखापत झाली नाही. असगोली येथील अन्य २५ हून अधिक मच्छीमार बांधवांनी नौकेवरील सर्व सामान काढून घेतले. दुपारी उशिरापर्यंत हे काम चालू होते. ६ ते ७ वर्षांपूर्वीची ही नौका असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.काही वर्षांपूर्वी उरण मुंबई येथील मोठी मच्छीमारी नौका भरकटून गुहागर समुद्रकिनारी लागली होती. सुस्थितीत असल्याने सर्व काम करून पुन्हा मुंबईमध्ये नेण्यात आली. त्यानंतर २००९ मध्ये फयानमध्ये असगोली येथीलच एक नौका बाजारपेठ समुद्रकिनाऱ्यालगत लागली होती. काही महिन्यांनंतर लाटांच्या तडाख्याने ही बोट फुटून गेली. गुहागर समुद्रकिनारी लागलेली ही तिसरी नौका असून, असगोली येथील दुसरी नौका आहे. (प्रतिनिधी)
भरकटलेली नौका अखेर समुद्रकिनाऱ्यावर
By admin | Published: October 25, 2015 10:57 PM